PhonePe : फोनपे वॉलेट वर्षभर वापरलं नाही तर भरावं लागणार शुल्क; तिमाही 100 रुपयांचा बोजा
PhonePe : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील आघाडीचे व्यासपीठ असलेल्या फोनपेने (PhonePe) आपल्या वॉलेट धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

PhonePe : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील आघाडीचे व्यासपीठ असलेल्या फोनपेने (PhonePe) आपल्या वॉलेट धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या नियमांनुसार, सलग ३६५ दिवस फोनपे वॉलेटद्वारे कोणताही आर्थिक व्यवहार न करणाऱ्या वापरकर्त्यांच्या वॉलेटला ‘निष्क्रिय’ (Inactive) श्रेणीत वर्गीकृत करण्यात येणार असून, अशा वापरकर्त्यांकडून प्रत्येक तिमाहीसाठी १०० रुपये (जीएसटीसह) निष्क्रिय देखभाल शुल्क आकारले जाणार आहे.
कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे या धोरणाची माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, केवळ फोनपे अॅप उघडणे, यूपीआयद्वारे बँक खात्यातून व्यवहार करणे किंवा रिचार्ज, बिल पेमेंट, कर्ज, विमा यांसारख्या सेवा वापरणे याला वॉलेट अॅक्टिव्हिटी मानले जाणार नाही.
यूपीआय व्यवहार ग्राह्य नाहीत
फोनपेने स्पष्ट केले आहे की, यूपीआयशी जोडलेल्या बँक खात्यातून केलेले व्यवहार, अॅपमध्ये लॉग-इन करणे किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे यामुळे वॉलेट सक्रिय समजले जाणार नाही. वॉलेट सक्रिय ठेवण्यासाठी वापरकर्त्यांनी थेट फोनपे वॉलेटमधून आर्थिक व्यवहार करणे आवश्यक राहणार आहे.
शुल्क आकारण्यापूर्वी मिळणार सूचना
वापरकर्त्यांच्या वॉलेटवर निष्क्रियता शुल्क आकारण्यापूर्वी कंपनीकडून १५ दिवसांची पूर्वसूचना दिली जाणार आहे. या कालावधीत वापरकर्त्यांनी वॉलेटद्वारे किमान एक व्यवहार केल्यास वॉलेट पुन्हा सक्रिय मानले जाईल आणि शुल्क आकारले जाणार नाही.
वॉलेटमधूनच होणार शुल्क कपात
वॉलेटमध्ये १०० रुपये किंवा त्याहून अधिक शिल्लक असल्यास कंपनी थेट १०० रुपये शुल्क वजा करेल. वॉलेटमधील शिल्लक रक्कम १०० रुपयांपेक्षा कमी असल्यास उपलब्ध असलेली संपूर्ण रक्कम वजा करण्यात येईल. मात्र, वॉलेटमध्ये नकारात्मक शिल्लक निर्माण केली जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
शुल्क टाळण्यासाठी वर्षातून एक व्यवहार पुरेसा
तज्ज्ञांच्या मते, निष्क्रियता शुल्क टाळण्यासाठी वापरकर्त्यांनी वर्षातून किमान एकदा तरी फोनपे वॉलेटद्वारे व्यवहार करणे आवश्यक आहे. यापूर्वी २०२१ मध्ये मोबिक्विकनेही निष्क्रिय वॉलेटसाठी देखभाल शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती.
देशभरातील मोठ्या संख्येने ग्राहक फोनपे वॉलेटचा वापर करत असल्याने या नव्या धोरणाचा लाखो वापरकर्त्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





