Phoenix Cup Table Tennis Tournament : नैशा रेवसकर हिला दुहेरी मुकुट

पुणे – नैशा रेवसकर हिने तेरा वर्षांखालील गटापाठोपाठ पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटातही विजेतेपद पटकावले आणि फिनिक्स चषक टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला.
मुलांमध्ये मात्र कौस्तुभ गिरगावकर याने श्रेयस माणकेश्वर याला या संधीपासून वंचित ठेवले व पंधरा वर्षांखालील गटात विजेतेपदावर मोहोर उमटवली.
मुलींच्या 15 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत नैशा हिने रुचिता दारवटकर हिच्यावर शानदार विजय मिळवला. हा सामना तिने 11-9, 11-5, 6-11, 6-11, 11-7 असा जिंकला. तेरा वर्षांखालील गटात नैशा रेवसकर हिने अंतिम लढतीत आद्या गवात्रे हिला पराभूत करीत सनसनाटी विजेतेपद पटकावले.
नैशा हिने हा सामना 9-11, 11-2, 11-7, 11-8 असा जिंकला. या मोसमातील तिचे हे तिसरे विजेतेपद आहे. मुलांच्या पंधरा वर्षांखालील गटात गिरगावकर याने श्रेयस याच्या विरुद्ध 11-5, 11-8, 11-7 असा एकतर्फी विजय मिळवला. तेरा वर्षांखालील मुलांच्या गटात श्रेयस याने अंतिम फेरीत अनंत कर्मपुरीचा 12-14, 11-3, 9-11, 11-7, 11-4 असा पराभव केला.




