Balluff Automation Players Cup 2024 : नैशा रेवसकरचा विजेतेपदाचा चौकार…

District Ranking Table Tennis Tournament :- बालुफ ऑटोमेशन प्लेअर्स चषक द्वितीय जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील महिला गटात नैशा रेवसकर हिने विजेतेपद पटकावले आणि विजेतेपदाचा चौकार नोंदविला. तिने यापूर्वी १५, १७ व १९ वर्षाखालील गटात अजिंक्यपद मिळविले होते. पुरुष गटात बिगर मानांकित खेळाडू संस्कार बसाक याने सनसनाटी विजेतेपद पटकावले. या दोन्ही खेळाडूंना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिकही देण्यात आले.
एक्स टेबल टेनिस प्लेअर्सतर्फे पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यास बालुफ ऑटोमेशन या जर्मन कंपनीचे प्रायोजकत्व लाभले. पुरुषांच्या अंतिम फेरीत संस्कार याने अव्वल मानांकित खेळाडू भार्गव चक्रदेव याचा ११-३,११-५,११-९,१२-१०असा सरळ चार गेम्स मध्ये पराभव केला. त्याने टॉप स्पिन फटक्यांबरोबरच बॅकहँडचेही अप्रतिम कौशल्य दाखविले. तो माजी राष्ट्रीय खेळाडू मंदिरा ठिगळे यांचा मुलगा असून त्याला निलेश पंडीरकर व राजीव सावंत यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
महिलांच्या अंतिम सामन्यात नैशा हिने क्रीडा प्रबोधिनीची द्वितीय मानांकित खेळाडू धनश्री पवार हिच्यावर ११-७, ११-६,११-७,९-११,११-७ असा सनसनाटी विजय नोंदविला. तिने टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ करीत पहिल्या तीनही गेम्स जिंकल्या. त्यावेळी ती एकतर्फी विजय मिळविणार असे वाटले होते. पहिल्या तीन गेम्स मध्ये धनश्री हिला बॅकहँडचेही फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नव्हते. चौथ्या गेम मध्ये तिने खेळावर नियंत्रण मिळवले आणि ही गेम घेत सामन्यात उत्सुकता निर्माण केली. मात्र नैशा हिने पाचव्या गेम मध्ये सुरुवातीची पिछाडी भरून काढत ही गेम घेतली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ती एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती अभिनव प्रशालेत इयत्ता आठवीत शिकत आहे.
Balluff Automation Players Cup 2024 : नैशा रेवसकरला एकेरीचे विजेतेपद
प्रौढांच्या ४० वर्षावरील गटात कृपाल देशपांडे हे विजेते ठरले. अंतिम सामन्यात त्यांनी रवींद्र जोशी यांचे आव्हान ११-७, ११-६,११-९ असे सरळ तीन गेम्स मध्ये परतविले. त्यांनी काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बालुफ ऑटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उदय भालचंद्र यांच्या हस्ते झाला. यावेळी अविनाश जोशी, डॉ.मोहन उचगावकर, श्रीराम कोनकर, राजीव बोडस, स्मिता बोडस, मनीषा बोडस, अनुराग कश्यप, अजय सिधये, प्रह्लाद राठी, श्रीकांत अंतुरकर, प्रकाश तुळपुळे, दीपेश अभ्यंकर, उपेंद्र मुळ्ये आदी उपस्थित होते. ही स्पर्धा माजी खेळाडूंतर्फे गेली २४ वर्षे पुरस्कृत केली जात आहे.



