जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा : नैशा, रुचिता व सई उपांत्य फेरीत

पुणे – अग्रमानांकित रुचिता दारवटकर, द्वितीय मानांकित नैशा रेवसकर व तृतीय मानांकित सई कुलकर्णी यांनी शानदार विजय मिळवत, श्री संत गाडगेबाबा चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील मुलींच्या पंधरा वर्षाखालील गटांत उपांत्य फेरी गाठली.
यंदाच्या मोसमात अनेक स्पर्धा जिंकणाऱ्या नैशा हिने श्रेया गायकवाड हिचा 11-8,11-3, 11-3 असा सरळ तीन गेम्स मध्ये पराभव केला. तिने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. कुलकर्णी हिने आद्या गवात्रे तिचे आव्हान 11-6,11-9,11-9 असे सहज संपुष्टात आणले. रुचिता हिने उपांत्यपूर्व फेरीत पलक जैसवानी हिला 11-5, 11-13, 11-7, 11-6 असे पराभूत केले. या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रुचिताने याआधी या स्पर्धेतील 19 वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावले आहे.
प्रौढ खेळाडूंच्या गटात द्वितीय मानांकित ओंकार जोग यांनी अमित ढेकणे यांना 14-12, 3-11, 11-5,11-7 असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. सहाव्या मानांकित रवींद्र जोशी यांनी तृतीय मानांकित दीपक कदम यांच्यावर अनपेक्षित विजय नोंदविला. शेवटपर्यंत चुरशीने झालेला हा सामना त्यांनी 7-11,11-8,11-8,8-11,12-10 असा जिंकला. याच गटात मनोज फडके यांनी आदित्य गर्दे यांना 11-8,11-9,6-11,6-11, 11-8 असे चिवट झुंजीनंतर पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतीत पराग पसरणीकर यांनी नचिकेत देशपांडे यांचा 8-11,14-12, 11-7,11-8 असा पराभव केला.
मुलींच्या 19 वर्षाखालील गटात रुचिता दारवटकर हिने विजेतेपद पटकावित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अंतिम सामन्यात तिने तितिक्षा पवार हिचा 11-6,8-11,11-8,11-9 असा पराभव केला. उपांत्य फेरीत रुचिता हिने अग्रमानांकित सई कुलकर्णी हिला 3-2 अशा गेम्स ने पराभूत करीत अनपेक्षित निकाल नोंदविला होता. अन्य उपांत्य फेरीत तितिक्षा हिने तृतीय मानांकित तनया अभ्यंकर हिच्यावर 3-2 अशी मात केली होती. मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात द्वितीय मानांकित वेदांग जोशी विजेता ठरला. त्याने अंतिम फेरीत पाचवा मानांकित ईशान खांडेकरविरुद्ध 15-13,11-3, 11-8, 10-12,11-8 असा जिंकताना टॉप स्पीन फटक्यांचा बहारदार खेळ केला.



