Philippine President to visit India : फिलीपिन्सचे अध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : फिलीपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर उद्या दुपारी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत फिलीपिन्सच्या फर्स्ट लेडी लुईस अरानेटा मार्कोस आणि अनेक कॅबिनेट मंत्री, इतर मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक प्रतिनिधींसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर येणार आहे. फिलीपिन्सचे अध्यक्ष झाल्यापासून ते प्रथमच भारत भेटीवर येत आहेत.
या भेटीदरम्यान मार्कोस ज्युनिअर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. मंगळवारी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत. फिलीपिन्सला परतण्यापूर्वी अध्यक्ष मार्कोस बेंगळुरूलाही भेट देतील. भारत आणि फिलीपिन्सदरम्यान १९४० मध्ये उच्चस्तरिय संबंध प्रस्थापित करण्यात आले आहेत. तेव्हापासून दोन्ही देशांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, सागरी सहकार्य, शेती, आरोग्यसेवा, औषधनिर्माण आणि डिजिटल तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांमध्ये मजबूत भागीदारी विकसित केली आहे.
दोन्ही देश प्रादेशिक पातळीवरही जवळून काम करतात. त्यामध्ये भारताच्या आसियानसोबतच्या व्यापक धोरणात्मक भागीदारीचा समावेश आहे. भारताचे फिलीपिन्ससोबतचे संबंध हे अॅक्ट ईस्ट पॉलिसी, व्हिजन महासागर आणि इंडो-पॅसिफिकच्या व्हिजनचा अविभाज्य आधारस्तंभ आहेत. फिलीपिन्सचे अध्यक्ष मार्कोस यांचा हा दौरा भारत-फिलिपिन्स राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त होत आहे. ही भेट दोन्ही नेत्यांसाठी भविष्यातील द्विपक्षीय सहकार्याचा मार्ग निश्चित करण्याची आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.





