Phaltan News – राज्याच्या अर्थसंकल्पात फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ९३ कोटी ३५ लाख रुपयांचा भरीव विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाल्याचे सांगितले जाते. या निधीमुळे मतदारसंघातील रस्ते, दळणवळण तसेच पायाभूत सुविधांच्या अनेक महत्त्वाच्या विकास कामांना चालना मिळणार आहे. मंजूर झालेली सर्व विकास कामे तातडीने सुरु करून त्यांची गुणवत्ता राखली जाईल, अशी ग्वाही नाईक निंबाळकर वपाटील यांनी दिली. नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारातून फलटणमध्ये प्रशासकीय इमारत, महसूल भवन, शहरातील पालखी महामार्ग, अंतर्गत रस्ते, तारांगण तसेच आधुनिक स्टेडियम यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झालाआहे. या प्रकल्पांपैकी बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरु झाली असून काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. मंजूर झालेल्या निधीतून मतदारसंघातील अनेक प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण, काँक्रिटीकरण तसेच गटार आणि संरक्षक भिंतींची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सासवड- भाडळे बु.- सोनवडी- विडणी- सांगवी रस्ता, गिरवी- मांडवखडक- निरगुडी- निंभोरे- जिंती- कोहाळे मार्ग, काळज- सासवड- हिंगणगाव- सालपे रस्ता, जिंती- साखरवाडी- नांदल- वाघोशी- उपळवे- गिरवी मार्ग, कांबळेश्वर रोड ते सोमंथळी रस्ता, आरडगाव- हिंगणगाव रस्ता, गिरवी- दुधेबावी- राजाळे- सांगवी मार्ग, भुईंज- देगाव- राऊतवाडी- पिंपोडे रस्ता, तसेच वाई- परखंदी- सोळशी- पिंपोडे मार्ग या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण जोडरस्त्यांची सुधारणा करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. सासवड, नायगाव, राजुरी, टाकळवाडे, कुरवली, गिरवी, सांगवी, ठाकुरकी, तावडी, पिंपळवाडी, फडतरवाडी, सुरवडी, सोनवडी, ढवळ, तरडगाव, जाधववाडी, गुणवरे, निंबळक, कापडगाव आदी गावांमधील विविध जोडरस्ते मजबूत करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी गावांतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच गटार बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच काही महत्त्वाच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधणे, बाह्य सुधारणा करणे आणि पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणाऱ्या ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. निरगुडी येथील लांडगेवस्ती रस्त्यावर ओढ्यावर पुल उभारणे तसेच गुणवरे ते मठाचीवाडी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे यांसारख्या कामांचाही या निधीत समावेश आहे. एकूण ९३ कोटी ३५ लाख रुपयांच्या या विकास कामांमुळे फलटण- कोरेगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते जाळे अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे शेतमाल वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा, तसेच व्यापारी व्यवहार अधिक सुलभ होणार असून ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.