Phaltan News: मजूर ते यशस्वी बागायतदार! बबन मुळीक यांच्या शेतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; तरुणांना दिला खास सल्ला
Phaltan News: मजुरीपासून सुरू झालेला प्रवास अन् उभारली आधुनिक बाग; प्रयोगशील शेतकरी बबन मुळीक यांच्या संघर्षाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक.

Phaltan News – तरुण पिढीने नवीन तंत्रज्ञानासोबत बबन मुळीक यांच्यासारख्या शेतकर्यांचस आदर्श डोळ्यापुढे ठेवून फळपिकांच्या क्षेत्रात शिखर गाठावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. सासकल, (ता. फलटण) येथील उद्यान पंडित शेतकरी बबन मुळीक यांच्या बागेत शिवार फेरी दरम्यान श्री. पाटील बोलत होते.
ते म्हणाले , तरुण शेतकर्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन, एआय आणि ठिबक सिंचन यांसारख्या साधनांचा वापर करावा. बबन मुळीक यांच्यासारख्या यशस्वी आणि प्रयोगशील शेतकर्यांचा संघर्ष आणि यश डोळ्यासमोर ठेवून काम करावे. पारंपरिक पिकांऐवजी फळपिकांच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून उच्चांक गाठावा.
आधुनिक फळबाग शेतीतून तरुण पिढीने आपले आर्थिक उत्पन्न वाढवून शेतीत शिखर गाठावे. शिवार फेरी दरम्यान संतोष पाटील यांनी डाळिंब पूजन करून बबन मुळीक यांनी परिश्रमाणे उभी केलेली आव्हाकडो, वॉटर अॅप्पल, सीताफळ तसेच जलतारा प्रकल्प, गांडूळ खत युनिटची पाहणी केली. बबन मुळीक म्हणाले, मजूर ते बागायतदार असा प्रवास, मुलांचं शिक्षण व बाग कामात कुटुंबाची साथ व जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी केलेले यामुळे चांगले यश मिळाले.
फलटणचे तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ भूषण यादगीरवार यांनी लागवडीचे अंतर, एकात्मिक किड रोग व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. यावेळी फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहनराव डांगे,
मंडळ कृषी अधिकारी अजित सोनवलकर, आबा लाड, रामदास कदम, मनोहर मुळीक, मोहन मुळीक, संजय चांगण, राजेंद्र धुमाळ, संजय फाळके, बबलू मुळीक, अजिंक्य मुळीक, निखिल मुळीक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी आभार मानले.



