हिंसाचारामुळे पेरूमध्ये आणीबाणी जाहीर, नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध; राजधानीत लष्कर तैनात

लिमा – पेरूमध्ये भडकलेल्या हिंसाचारामुळे अध्यक्ष दिना बोलुआर्ते यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. देशातील एका लोकप्रिय गायकाच्या हत्येनंतर देशभर मोठा हिंसाचार उसळला आहे. हा हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांच्या मदतीला लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. देशात लागू करण्यात आलेली आणीबाणी ३० दिवसांसाठी लागू असणार आहे. या कालावधीमध्ये प्रशासनाकडून नागरिकांच्या काही हक्कांना नियंत्रित केले जाणार आहे. यामध्ये नागरिकांचे एकत्रीकरण आणि हालचालींवर निर्बंध येणार आहेत. तसेच या कालावधीमध्ये पोलीस आणि लष्कर कोणत्याही कायदेशीर आदेशांशिवाय संशयिताला ताब्यात घेऊ शकणार आहेत.
पेरूमध्ये अलिकडच्या काही महिन्यांत हत्या, हिंसक खंडणी आणि सार्वजनिक ठिकाणी हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिनांक १ जानेवारी ते १६ मार्च या कालावधीत पोलिसांनी ४५९ हत्यांची नोंद केली. फक्त जानेवारी महिन्यात खंडणीच्या १,९०९ तक्रारी दाखल करण्यात आल्या. परंतु रविवारी कम्बिया बँड आर्मोनिया १० चे ३९ वर्षीय प्रमुख गायक पॉल फ्लोरेस यांच्या हत्येनंतर संतापाची लाट उसळली.
रविवारी पहाटे लिमा येथे एका संगीत कार्यक्रमानंतर फ्लोरेस आणि त्याच्या सहकाऱ्यांसमवेत प्रवास करत होते. तेंव्हा त्यांच्या बसवर हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात फ्लोरेस यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
आठवड्याच्या शेवटी घडलेली फ्लोरेस यांची हत्या हा एकमेव हिंसक प्रसंग नव्हता. शनिवारी, राजधानीतील एका रेस्टॉरंटमध्ये एका वस्तूचा स्फोट झाला, ज्यामध्ये किमान ११ लोक जखमी झाले होते. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान झालेल्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी बोलुआर्टे प्रांताच्या सरकारने यापूर्वी एका प्रांतापुरती आणीबाणीची घोषणा केली होती.
देशातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाकडे कोणतीही योजना नसल्याचे सांगून गृहमंत्री जुआन जोस सॅन्टिवानेझ यांच्याविरोधात विरोधकांनी संसदेमध्ये अविश्वास ठरावाची मागणी केली. या आठवड्याच्या अखेरीस संसदेच्या अधिवेशनादरम्यान या अविश्वास ठरावावर मतदान होण्याची शक्यता आहे.





