PUNE: पुरंदर विमानतळाला आमच्याकडून परवानगी

पुणे – पुण्यातील पुरंदर विमानतळाला आमच्याकडून परवानगी देण्यात आली आहे. आता पुरंदर विमानतळाचा प्रश्न राज्य पातळीवरील आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. राज्य सरकार आता वेगाने जागा ताब्यात घेऊन काम कधी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे विमानतळ येथील जागा अपुरी पडत असल्यामुळे नवीन विमानतळ पुरंदर येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, या विमानतळाच्या परवानग्या, भूसंपादन अशा वेगवेगळ्या गोष्टीत तो रखडला असल्याचे बोलले जात होते. ठाकरे सरकारच्या काळात विमानतळाची जागा बदलली जाणार असल्याची चर्चा होती. पण, शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पूर्वीच्या ठिकाणीच विमानतळ उभारले जाईल, असे जाहीर केले.
आता या विमानतळाला हवाई नागरी वाहतूक मंत्री शिंदे यांनी त्यांच्या मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आल्याचे सांगितले आहे. विमानतळाचा प्रश्न राज्य सरकारच्या पातळीवर असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्य सरकारकडून आता तातडीने जागा संपादन व इतर कामे तातडीने करून तो उभारण्याची कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
२०० विमानतळ उभारण्याचे उदिष्ट
देशात सात ते आठ विमानतळ तयार झाली आहेत. सोडेनऊ वर्षांत अयोध्या, पुणे, कोल्हापूर, लखनऊ, दिल्ली, जबलपूर, ग्वाल्हेर यासह अन्य ठिकाणी विमानतळ सुरू आहे. 2030 पर्यंत २०० विमानतळ, हॅलीपॅड उभारण्याचे ध्येय आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. पुण्यातील धावपट्टीच्या विस्ताराबाबत संरक्षण मंत्रालयासोबत बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


