“बारसुच्या लोकांना सरकारवर विश्वास नाही…’; संजय राऊत यांचा सवाल

मुंबई – बारसू प्रकल्पाच्या आंदोलकांचा राज्यातील सरकारवर विश्वास नाही, त्यामुळे चर्चा कोणाशी करायची असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्याची सुचना केली होती. त्यावर राऊत म्हणाले की म्हणजे स्थानिकांनी नेमके काय करायचे? त्यांचा या सरकारवर विश्वासच राहिलेला नाही असे ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी बारसू येथे जमीन खरेदी केलेल्या राजकारणी आणि बाहेरच्या लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी तेथे हा रिफायनरी प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप केला. सरकारने अशा लोकांची यादी जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली.
राऊत म्हणाले की, नाणार येथे रिफायनरी उभारण्याची योजना रखडल्यानंतर केंद्राकडे पर्यायी जमिनीची मागणी सातत्याने होत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. दिल्लीच्या आग्रहावरून पर्यायी जमीन प्रस्तावित करण्यात आली. मात्र अडीच वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळजबरीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला नाही असे स्पष्टीकरणही राऊत यांनी दिले.
लोकांना प्रकल्प नको असेल तर बारसू रिफायनरी प्रकल्पाची गरज नाही, अशी आमची भूमिका आहे. आणि ज्या प्रकारे स्थानिकांचा विरोध आहे आणि वातावरण आहे, ते पहाता सरकारने भूसंपादन आणि सर्वेक्षण थांबवावे, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येणार नाही, असेही त्यांनी सांगितले





