“एकदाही बहुमत देऊन जनतेने पवारांना मुख्यमंत्री केले नाही”; दिलीप वळसे पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका

मुंबई – अजित पवार गटातील नेते दिलीप वळसे पाटील यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली केली आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील नेत्यांचे आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. यातच आता दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘जनतेने एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केले नाही,’ असे वळसे पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दिलीप वळसे पाटील मंचर येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. जनतेनं एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात.”
यावेळी त्यांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. राज्य सरकारमध्ये मी, अजित पवार व काही सहकारी सहभागी झालो. याचा अर्थ भारतीय जनता पक्षात गेलो असे अजिबात नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच आहोत. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी ईडीवरून होत असलेल्या टीकेवर देखील भाष्य केले आहे. “ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली, त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले असा अपप्रचार केला जात आहे. ते चुकीचे आहे. तशी नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल,” असे आव्हान देखील दिलीप वळसे पाटील यांनी दिले.





