पुणेः काल सायंकाळी सासवड शहरातील पालखी मैदानावर पुरंदर विधानसभेचे आमदार विजय शिवतारे यांच्या वतीने आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांचे, आनंद दिघे यांचे विचार सोडणाऱ्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत थारा दिला नाही, असे शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. तसेच आगामी काळात पुरंदरमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी पुरंदरकरांना दिले. महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत आमच्या शिवसेनेला दोन लाख मते ठाकरेंपेक्षा जास्त मिळाली. विधानसभेत १५ लाख जास्त मते मिळाली. आमच्या ८० पैकी पैकी ६० जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची अशी विचारणा त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे नेणारे खरे कोण आहे हे सर्वांना माहिती असल्याचे शिंदे म्हणाले. ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना जनतेने थारा दिला नाही, अशा कडक शब्दांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र डागले. दीड वर्षांत गुंजवणीचे पाणी आणणार येणाऱ्या दीड वर्षांत किंवा त्याआधीच कोणत्याही परिस्थितीत पुरंदरमध्ये गुंजवणीचे पाणी येईल. या योजनेचे सहा किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे भविष्यात गुंजवणी, विमानतळ, आयटी पार्क असे प्रकल्प करून मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही सर्व एकदिलाने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पुरंदर विधानसभेचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली.