महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्रातील राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी लोकांच्या आणि मीडियाच्या मनात कायमच कुतूहल राहिले आहे. या विधानसभा निवडणुकीला मनसे हा पक्ष स्वतंत्र अस्तित्व दाखवत स्वतःचा बाणा पुन्हा दाखवण्याच्या तयारीत असेल असे सगळ्यांनाच वाटले होते. पण याही निवडणुकीत मनसेच्या या स्वतंत्र बाण्याची कोंडीच झालेली पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्राला काँग्रेसप्रणित आघाडी आणि भाजपप्रणित आघाडी यांच्यापेक्षा काही तिसरा नवीन भक्कम पर्याय मिळाला तर हवा होता. किंबहुना राज्यातील काही मतदार अशा वेगळ्या प्रयोगाला कदाचित साथ देण्याच्या मनस्थितीत होते. त्या दृष्टीने मनसेकडे अनेकांचे लक्ष होते. पण मनसेची स्थिती आज पुन्हा कोंडीत सापडल्यासारखी दिसली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपण महायुतीबरोबर सत्तेत बसणार आहोत, असा दावा केला आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष हा महायुतीतलाच पक्ष म्हणून मतदार जमेला धरणार असतील, तर या पक्षाला आता फार आश्वासक वातावरण असणार नाही अशी चिन्ह आहेत. प्रत्यक्ष प्रचाराच्या आधीच राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत आमचा पक्ष आता सत्तेत असेल आणि महायुतीच सत्तेवर येईल असे जे प्रतिपादन केले आहे त्याचा तपशील बघितला तर असे लक्षात येते की राज ठाकरे यांना भाजपच्या अंगानेच राजकारण करावे असे वाटू लागले आहे. त्यांच्या या भूमिकेचा राज ठाकरे यांना नेमका किती फायदा होतो हे पहावे लागेल. पण जर राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात असेल तर त्या वातावरणाचा मोठा फटका राज ठाकरे यांना बसू शकतो हे सांगण्यासाठी राजकीय जाणकारांच्या प्रतिपादनाची गरज नाही. मात्र, त्याच वेळी मनसे महायुतीच्या सरकारला पाठिंबा देणार, या राज ठाकरे यांच्या भूमिकेचा महायुतीच्या उमेदवारांना कितपत लाभ होईल याचा अंदाज लागत नाही. ही सगळी भूमिकांची अदलाबदल आणि कोलांट्या सुरू असतानाच महायुतीतलाच एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातच कडाक्याची जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. माहीमच्या जागेवर राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे गरजेचे होते. त्यासाठी राज ठाकरे यांनी भाजपच्या साथीने प्रयत्न केले पण त्यांना सदा सरवणकर यांची उमेदवारी आड आली. सरवणकर यांना माघार घ्यायला लावणे हे काही फार आव्हानात्मक काम नव्हते. पण त्यातही राज ठाकरे यांना यश आलेले पाहायला मिळाले नाही. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात गोडीगुलाबीचे संबंध आहेत असे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. त्याचा वापर करून एकनाथ शिंदे यांच्यामार्फत सदा सरवणकर यांना माघार घ्यायला लावणे हे तुलनेने सोपे काम होते, पण हे पडद्यामागचे राजकारणसुद्धा राज ठाकरे यांना समर्थपणे करता आले नाही. आता माहीममध्ये सदा सरवणकर हे अमित ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. राज ठाकरे यांचे दुर्दैव असे की खुद्द फडणवीस आणि भाजपची साथ असतानाही मुख्यमंत्र्यांचाच पक्ष माहीममध्ये त्यांच्या विरोधात उभा आहे. फडणवीस यांच्यामार्फतसुद्धा सरवणकर यांना खाली बसवता आले असते, तेही मनसेला जमले नाही. राजकारणात बेरीज, वजाबाकी आणि पडद्याआडच्या खेळ्या यांना फार महत्त्व असते. काही वेळेला पूर्ण अनुकूल स्थिती असूनही ती नेमकी जोखता न आल्याने राजकारणात अपयश पदरात पडते. तोच अनुभव राज ठाकरे यांच्या मनसेला वारंवार येताना दिसतो आहे. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडून अमित ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करणे सहज शक्य असताना तिकडे सरवणकर यांनीच राज ठाकरे यांना कोंडीत पकडल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधातील उमेदवार जर मनसे मागे घेणार असेल तर आपण माहीममधून माघार घेऊ, अशी बेरकी भूमिका सरवणकर यांनी घेतली आणि त्यांनी राज ठाकरे यांनाच चौफेर कोंडीत पकडले. या पार्श्वभूमीवर सध्या निवडणूक प्रचार दौर्याला बाहेर पडलेले राज ठाकरे हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीतल्या महत्त्वाच्या नेत्यांवरच टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे ते नेमके सध्या कोठे उभे आहेत हे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनाच उमगेनासे झालेले आहे. ही स्थिती लक्षात घेतली तर याही निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फार भरभक्कम यश मिळेल असा दावा कोणालाही करता येणार नाही. वास्तविक लोकसभा निवडणुकीत भाजपाला एकतर्फी पाठिंबा देऊन आपले उमेदवार उभे न करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर विधानसभेची तयारी करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा अवधी होता. पण त्या अवधीचाही त्यांनी फार लाभ करून घेतलेला दिसला नाही. जर स्वबळावरच लढायचे होते तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या खूप आधीच आपले उमेदवार जाहीर करून त्यांनी निवडणुकीचे रणांगण गाजवायला सुरुवात करायला हवी होती. तेथेही हा पक्ष आणि त्यांचे नेतृत्व कमी पडलेले दिसले. मुळात राज ठाकरे यांच्याविषयी जनतेमध्ये कमालीचे आकर्षण असतानाही आणि त्यांच्याकडे सर्व राज्यभर युवक कार्यकर्त्यांची दमदार फळी असतानाही हा पक्ष केवळ, योग्य वेळी योग्य भूमिका न घेतल्याची फळे भोगताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले एक चांगले नेतृत्व पुन्हा कोंडीत सापडले आहे, असेच म्हणावे लागते.