पिंपरी | मावळ तालुक्यात शांततेत मतदान

मावळ – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १३) मावळ तालुक्यात शांततेत मतदान झाले. मावळ तालुक्यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. पहिल्या दोन तासांत अवघे ३.४१ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाने काहीचा वेगा घेतला.
सकाळी अकरा वाजेपर्यंत १४.७५ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात म्हणजे सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी दुप्पट म्हणजे २८.३ टक्के झाली. वाढत्या उन्हाचा परिणाम मतदानाच्या वेगावर झाला. दुपारी एक ते तीन वाजताच्या दरम्यान ३७.५ टक्के इतके मतदान झाले.
पोलिंग एजंटचा अभाव
मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत सर्वच राजकीय पक्षांना बुथ लावण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच मतदान केंद्रावरील राजकीय पक्षांच्या पोलिंग एजंटानाही मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी होती. तालुक्यातील काही मतदान केंद्रावर राजकीय पक्षांच्या दुर्लक्षामुळे मतदान केंद्रावर पोलिंग एजंटचा अभाव दिसून आला.
मतदान केंद्र शोधताना धावपळ
कामशेतमध्ये काही मतदारांना मतदान स्लीप मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे मतदान कंद्र शोधताना त्यांची धावपळ उडाली. काहींनी पूर्वी मतदान केलेल्या केंद्रावर जाऊन मतदान केले.
मोबाइलवरून वादावादी
अनेक राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मोबाइलवर मतदानाची स्लीप पाठविली आहे. मात्र मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी असल्याने अनेक नागरिक मतदान न करताच घरी गेले. मोबाइलवरून नागरिक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची होत होती. यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाची दुटप्पी भूमिका
एकीकडे मतदान केंद्राकडे जाताना १०० मीटरच्या आत मोबाइल नेण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. तर दुसरीकडे नागरिकांनी मतदान केले हे सोशल मिडियावर टाकण्यासाठी सेल्फी पॉइंट ठिकठिकाणी तयार केले होते. निवडणूक आयोगाच्या या दुटप्पी भूमिकेचा नागरिकांकडून निषेध व्यक्त होत होता.
तळेगावमध्ये टेक्निकल एर्रर
मावळ तालुक्यातील तळेगावमध्ये असलेल्या गणेश वाचनालय येथे मतदान यंत्रात टेक्निकल एर्रर आल्याने अगदी थोड्यावेळ मतदान बंद झाले. मात्र हा तांत्रिक बिघाड दूर केल्याने त्वरीत मतदान सुरू झाले.
अवकाळी पावसाचे आगमन
मावळ लोकसभा क्षेत्रातील खालापूर, कर्जत, खोपोली आदी भागामध्ये सोमवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मतदानासाठी गेलेले नागरिक मतदान केंद्रामध्येच अडकून पडले. तर ज्यांना मतदानासाठी जायचे होते त्यांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. अवकाळी पावसाचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.





