पुणे : ‘अरे…इतना सन्नाटा क्यू है भाई..?’; नगरसेवकांची मुदत संपताच पालिकेत शांतता

पुणे – नगरसेवकांची मुदत संपताच मंगळवारी महापालिकेत शुकशुकाट पहायला मिळाला. मागील 15 दिवसांत महापालिकेत कार्यकर्ते आणि नागरिकांसह नगरसेवकांची मोठी वर्दळ होती. तर, पक्ष कार्यालयेही गर्दीने गजबजून जात होती. मात्र, मंगळवारी अनेक कार्यालयांना टाळे लावलेले होते तर काही कार्यालयात केवळ कर्मचारी कामकाज करत आहेत.
महापालिका सभागृहाची मुदत सोमवारी रात्री संपली. त्यामुळे मंगळवारपासून आयुक्त प्रशासक झाले असून, नगरसेवकही आता सर्वसामान्य नागरिक असणार आहेत. त्यामुळे त्यांनाही इतर नागरिकांप्रमाणेच महापालिकेत यावे लागणार आहे. पक्ष कार्यालये वापरता येणार नाहीत. मात्र, ही कार्यालये करोनानंतरचे निर्बंध उठल्यानंतर गजबजलेली होती. नव्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर कायम वर्दळ असायची. महापौर, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्षांसह विरोधी पक्षनेत्यांना भेटण्यासाठी नागरिक येत, कार्यकर्ते, ठेकेदार यांचीही कार्यालयाबाहेर वर्दळ असायची. पण हे सर्व कार्यालय आजपासून बंद झाली. तसेच या कार्यालयांमधील चहापाण्याची व्यवस्थाही बंद झाली.
त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर गर्दी नव्हती. तर काही मोजकेच नगरसेवक अधिकाऱ्यांना येऊन भेटून जाताना दिसून आले. मात्र, महापालिकेचे आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत असल्याने बिलांसाठी ठेकेदार तसेच ठेकेदारांच्या कर्मचाऱ्याकडून बांधकाम विभाग, पथ विभाग, पाणी पुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग घनकचरा विभागात गर्दी केल्याचे पहायला मिळाले.





