नवी दिल्ली : केंद्र सरकार बंदुकीच्या धाकावर मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहे अशी टीका कॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला भेट देऊन लोकांची भीती आणि चिंता जाणून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू करताना गौरव गोगोई यांनी यावर भर दिला की बंदुकीच्या धाक दाखवून ईशान्य राज्यात शांतता प्रस्थापित करता येणार नाही आणि त्यासाठी फक्त राजकीय तोडगा हाच मार्ग आहे. मणिपूरच्या अर्थसंकल्पावर राज्य विधानसभेत चर्चा व्हायला हवी होती, परंतु राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागील कारण सभागृहाला कळवावे. राज्यातील विधानसभेची स्थिती काय आहे – ती विसर्जित झाली आहे की निलंबित अवस्थेत आहे, असा प्रश्न गौरव गोगोई यांनी विचारला. यानंतर, निशिकांत दुबे यांच्यासह भाजप सदस्यांनी गोगोई यांनी मणिपूरमधील परिस्थितीचा व्यापक उल्लेख केल्यावर आक्षेप घेतला आणि काँग्रेस नेत्याने अनुदान मागण्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलावे अशा नियमांकडे लक्ष वेधले. गोगोई म्हणाले, जर तुम्हाला मणिपूरमध्ये शांतता हवी असेल तर मणिपूरच्या लोकांना बोलू द्या. जर तुम्हाला मणिपूरमध्ये शांतता हवी असेल तर मणिपूरच्या लोकांचे ऐकण्याचा संयम बाळगा. त्यांच्या राजकीय आकांक्षा काय आहेत, त्यांच्या भीती काय आहेत? ते ऐकण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही गोगोई यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला, ज्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांच्या सभागृहात अनुपस्थितीचा उल्लेख केला होता. गोगोई आणि सीतारामन यांच्यात यावेळी शाब्दीक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.