PCMC Portal : महापालिकेच्या योजनांची माहिती आता तुमच्या मोबाईलवर ; जाणून घ्या नव्या वेबपेजविषयी

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या कामकाजात तांत्रिक पारदर्शकता व गतीशीलता आणण्यासाठी स्वतंत्र वेबपेज तयार करण्यात आले आहे. त्याचे अनावरण नुकतेच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले असून या वेबपेजवरून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना मदत होईल, असा दावा प्रशासनाचा आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, सह आयुक्त मनोज लोणकर, नगर सचिव मुकेश कोळप, समाज विकास विभाग उप आयुक्त ममता शिंदे आदी उपस्थित होते.
समाज विकास विभागामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये महिला व बालकल्याण योजना, दिव्यांग कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याण योजना आणि इतर अनेक उपयोजना यांचा समावेश आहे. या सर्व योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक मदत, सुविधा व लाभ दिले जातात. या सर्व योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना अधिक सुलभतेने उपलब्ध व्हावी, तसेच अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता व वेग वाढावा यासाठी समाज विकास विभागाचे हे स्वतंत्र वेबपेज तयार करण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज करणे अधिक सोयीस्कर..
मनव्याने बनविण्यात आलेल्या https://www.pcmcindia.gov.in/samaj_vikas या वेबपेजच्या माध्यमातून नागरिकांना समाज विकास विभागाच्या सर्व योजनांची माहिती, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज प्रक्रिया तसेच विभागाने राबविलेले उपक्रम याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे. सर्व लाभार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि पात्र लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असे समाज विकास विभागाने म्हटले आहे.





