PCMC Police: ड्रंक अँड ड्राईव्हला लगाम; पिंपरी-चिंचवडमध्ये ८ दिवसांत ३६५ चालकांवर कारवाई

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने शहरात विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा सप्ताह राबवला. मागील आठवडाभरात मद्यप्राशन करून वाहन चालविणारे ३६५ चालक आणि काळ्या काचांचा वापर करणाऱ्या ११५६ वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत वेळोवेळी विशेष मोहीम राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत दिनांक २० डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत वाहतूक शाखेच्या सर्व विभागांमध्ये नाकाबंदीचे पॉईंट्स लावून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.
ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेदरम्यान मद्यपान करून वाहन चालविताना आढळलेल्या एकूण ३६५ चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक दंड आकारण्यात आला असून, न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करून वाहनांना काळ्या काचा लावणाऱ्या ११५६ वाहनांवरही पोलिसांनी कारवाई केली.
या वाहनधारकांकडून एकूण १३ लाख ८४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त विवेक पाटील म्हणाले, मद्यप्राशन करून वाहन चालविणे हा एक गंभीर गुन्हा असून यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात येतो.
असेनागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला होणारी गर्दी लक्षात घेता, तळीरामांवरील ही विशेष मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत अशीच सुरू राहणार आहे.





