PCMC News: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांना जबाबदार कोण? पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
PCMC News: चिखली परिसरात चिमुकलीवर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिका आवारात आंदोलन; भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.

PCMC News – चिखली परिसरात लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेचे पडसाद गुरुवारी (दि. २०) महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात उमटले. शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २०) होती. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक यश साने, संगीता ताम्हाणे आणि विकास साने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क जिवंत श्वान महापालिका आवारात आणले.
तसेच चिखली घटनेत जखमी झालेल्या चिमुकलीला देखील आणले होते. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिखलीतील घटनेनंतरही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नगरसेवक यश साने यांनी केला.
“शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या हा नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. लहान मुलीवर हल्ला होऊनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड करता येणार नाही.”
– भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते





