PCMC News – वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी खरबदारी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने १५ मे ते ०१ जून या कालावधीत होर्डिंगवर जाहिराती न लावण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील जाहिरात होर्डिंगचालक व धारक आणि आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकार्यांची बैठक नुकतीच झाली. वादळी वारे, अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यात जिवित व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या १५ एप्रिल ते ०१ जून असे पंधरा दिवस होर्डिंगवर जाहिरात बॅनर न लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या काळात होर्डिंग रिकामे ठेवण्यात येणार आहे. शहरात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांचा अंदाज लक्षात घेता महापालिका प्रशासनाने जाहिरात फलकधारकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या मोठ्या जाहिरात फलकांमुळे वादळी वाऱ्यात जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी चिंचवड महापालिका. यापूर्वीही अशा घटनांमध्ये नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खबरदारीचे उपाय सुचवले आहेत. प्रशासनाने सर्व फलकधारकांना त्यांच्या जाहिरात फलकांची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. फलकांचे लोखंडी सांधे, बेस स्ट्रक्चर व इतर भाग सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच आवश्यक तेथे दुरुस्ती करावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येक जाहिरात फलकावर क्यूआर कोड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित फलकावर क्यूआर कोड किंवा आवश्यक माहिती दर्शवणारी पाटी नसल्यास तो फलक अनधिकृत समजून महापालिकेकडून निष्कासनाची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई १५ मे ते ०१ जून २०२६ या कालावधीत काटेकोरपणे राबविण्यात येणार असून, नियमांचे पालन न करणाऱ्या फलकधारकांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच १ मे ते १४ मे पर्यंत लावलेल्या जाहीरातींच्या बॅनरला होल पाडावे लागणार आहे. त्यामुळे त्यामधून हवा जाऊन ते कोसळण्याचा धोका कमी होईल. महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. “पावसाळ्यापूर्वीच्या २ आठवड्याच्या काळात होर्डिंग रिकामे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या काळात होर्डिंगवर जाहिराती लावल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे होर्डिंगधारकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.” – राजेश आगळे, उपायुक्त.