PCMC News – पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून ७ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून ३ जणांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली जाणार आहे. मागच्या महिन्यातच याबाबत निर्णय होणार होता. मात्र, भाजपाने मुदत वाढवून घेत एप्रिल महिन्यामध्ये स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. आता आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आयत्यावेळी सात जणांची नावे देण्यात येणार आहेत. त्याला मान्यता घेतल्यानंतर अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जणांना स्वीकृत पदावर संधी दिली आहे. त्यामध्ये सीमा सावळे, फजल शेख आणि राजेंद्र जगताप यांचा समावेश आहे. भाजपाच्या गटा-तटाच्या राजकारणामुळे स्वीकृत पदावर कोणाला संधी द्यायची याबाबत एकमत करण्यासाठी तब्बल दोन महिने कालावधी लागला. त्यात आता एकमत झाले असून सोमवारी नावे सादर करण्यात येणार आहे. सात पैकी भोसरी व चिंचवडला प्रत्येकी तीन जागा व पिंपरी विधानसभेला एक जागा देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – भाजप मात्र, त्यामध्ये देखील पिंपरी विधानसभा दोन जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाचा घोळ कायम असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत यंदा भाजपाचे ८४ नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर एक अपक्ष असलेल्या नगरसेवकाने देखील भाजपमध्ये सामील होणे पसंत केले आहे. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ नगरसेवक आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. नगरसेवक बलाबलानुसार स्वीकृत नगरसेवक निवडले जातात. सन २०२३ च्या नियमामुळे स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली आहे. ती पाचऐवजी दहा झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपाचे ७ आणि राष्ट्रवादीचे ३ स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. राष्ट्रवादीचे एक नाव बदलण्यासाठी आटापिटा राष्ट्रवादी काँग्रेसमधील सीमा सावळे यांचे नाव बदलण्यासाठी भाजपाने मोठी ताकद लावली आहे. सभागृहात विषयांना विरोध करून अनेक कामांमध्ये त्या डोईजड होणार असल्याची भीती भाजपाला आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यामध्ये यासाठी मोठ्या खटापटी करण्यात आल्या. मात्र, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ काय निर्णय घेणार हे महत्वाचे आहे. राष्ट्रवादीचे एखादे नाव बदलू शकते असा दावा सत्ताधाऱ्यांच्या एका पदाधिकाऱ्यांने केला आहे.