PCMC News: पाणी साचलं तर अधिकाऱ्यांची खैर नाही! पालिका आयुक्तांचा थेट ‘ऑन द स्पॉट’ इशारा
PCMC News: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडून नाले आणि नदीपात्रांची प्रत्यक्ष पाहणी; निष्काळजी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत.

PCMC News – आगामी पावसाळ्यात पिंपरी-चिंचवडकरांना पुराच्या पाण्यात अडकवून ठेवणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांना आणि नदी-नाल्यांचा गळा घोटणाऱ्या अतिक्रमणधारकांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी थेट इशारा दिला आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना, आयुक्तांनी शनिवारी स्वतः शहरातील विविध नाले आणि नदीपात्रांची प्रत्यक्ष पाहणी करून मान्सूनपूर्व कामांचा ‘ऑन द स्पॉट’ आढावा घेतला.
“शहरात कुठेही पाणी साचले नाही पाहिजे आणि पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे,” असे सक्त निर्देश देत आयुक्तांनी प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह शिक्षक कॉलनी आणि पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्राची बारकाईने पाहणी केली.
नदी आणि नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता किती आहे, याची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. अतिवृष्टीच्या काळात ज्या सखल भागात पाणी साचण्याची किंवा पूर येण्याची दाट शक्यता असते, अशा संभाव्य ‘डेंजर झोन’ची यादी तयार करून तेथे २४ तासांत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

पिंपळे निलख ः नदी-नाल्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी.
शहरातील नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह रोखून त्यावर बेकायदेशीरपणे उभी राहिलेली अतिक्रमणे हेच पूरस्थितीचे मुख्य कारण ठरत आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या अशा सर्व अतिक्रमणांवर कोणतीही दयामाया न दाखवता थेट आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
यंत्रणांनी ‘एसी’ केबिन सोडून सतर्क राहावे!
”पावसाळ्यात सामान्य नागरिकांना कोणताही मनस्ताप किंवा त्रास सहन करावा लागता कामा नये. महापालिकेच्या सर्व विभागांनी आपापसातील समन्वय वाढवून २४ तास सतर्क राहावे,” असे आवाहन आयुक्तांनी केले. नागरिकांची सुरक्षा हीच महापालिका प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात:
आयुक्तांच्या या धडक पाहणी दौऱ्यात महापालिकेचे संपूर्ण वरिष्ठ प्रशासन रस्त्यावर उतरले होते. यामध्ये: अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, योगेश फल्ले, अंकुश झिटे, शांताराम माने यांच्यासह कार्यकारी अभियंता, सह अभियंता आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





