PCMC News – पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून ७ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून ३ जणांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकाची माळ आपल्या गळ्यात पडून आपण सभागृहात जावे यासाठी अनेकांनी सेटिंग सुरू केले आहे. तर अमुक एखादा महापालिकेत नकोच यासाठी सत्ताधारी पक्षातील काहींनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये स्वीकृतसाठी चांगलेच राजकारण रंगणार असल्याचे स्पष्ट आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत यंदा भाजपाचे ८४ नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर एक अपक्ष असलेल्या नगरसेवकाने देखील भाजपमध्ये सामील होणे पसंत केले आहे. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ नगरसेवक आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. नगरसेवक बलाबलनुसार स्वीकृत नगरसेवक निवडले जातात. सन २०२३ च्या नियमामुळे स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली आहे. ती पाचऐवजी दहा झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपाचे ७ आणि राष्ट्रवादीचे ३ स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. दुसर्या पक्षातून भाजपा आणि राष्ट्रवादीत आलेल्यांना नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, निवडणुकीत बंडखोरी न करता माघार घेतलेल्या अनेकांना पक्षाने स्वीकृत नगरसेवकाचे आश्वासन दिले होते. पक्षाच्या उमेदवारांचे जीव तोडून काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते, पक्षाचे समर्थक व्यावसायिक, उद्योजकही स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून तयारी करीत आहे. भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. कोणाला संधी द्यावी आणि कोणाला शांत करावे, असा पेच स्थानिक नेतेमंडळींसमोर निर्माण झाला आहे.तर, दुसरीकडे डोईजड होतील अशांना स्वीकृत पद द्यायचे नाही यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधक असलेल्या पक्षातून देखील एखादा सभागृहात आला तर त्रास होईल या भावनेतून त्याला स्वीकृत पद न देण्यासाठी राजकारण खेळले जात आहे. येत्या काही दिवसांत हे राजकारण आणखी रंगतदार वळणावर येण्याची चिन्हे आहेत. पराभूत नगरसेवकांचा पत्ता कट? महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले अनेक जण स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. स्थानिक नेत्यांसह राज्यातील नेत्यांकडे त्यांच्या चकरा वाढल्या आहेत. पक्षाच्या पदाधिकार्यांकडे त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मनधर्णी केली जात आहे. मात्र, भाजपकडून अशा पराभूत नगरसेवकांना संधी देण्याची शक्यता कमी आहे. तसा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असल्याची माहिती आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय ? स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेद्वारे होत नाही. शहरातील अनुभवी, कार्यकुशल आणि प्रशासन, कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक सेवा आदी विविध क्षेत्रात योगदान देणार्या व्यक्तींना ही संधी दिली जाते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शासकीय अधिकारी, खेळाडू, व्यावसायिक, सेवा निवृत्त अधिकारी, वकील, डॉक्टर, पत्रकार, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच, सामाजिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींचा यात समावेश अपेक्षित असतो.