PCMC News – महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी सत्ताधारी असलेल्या भाजपामध्ये एकमत होत नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे विरोधी बाकावर बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला पुढे करत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीकडून राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका सीमा सावळे आणि फजल शेख यांचे स्वीकृतसाठी अर्ज भरले आहेत. तर भाजपकडून अद्याप संभाव्य उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. भाजपमध्ये स्वीकृत पद कोणाला द्यायचे यावरून शहरातील कारभाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याचे पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे. तर यानिमित्ताने पदाकडे डोळे लावून बसलेल्यांना पुन्हा वाट बघावी लागणार आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीसाठी बुधवारी (दि. ४) अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली नावे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर केली. त्यांच्या अर्जांची छाननी होऊन तिघांचेही अर्ज वैध ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सामाजिक समतोल साधण्यावर भर देण्यात आला असून, विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादीकडून तब्बल नऊ जणांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती तसेच अल्पसंख्याक घटकांचा समावेश असणार असल्याचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपकडून संभाव्य नावांबाबत पूर्ण गोपनीयता पाळली जात आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम निर्णयावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते. भाजपकडून पाच वर्षांत तब्बल चौदा जणांना संधी देण्याचा विचार असून अडीच वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवक देण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपाकडे शंभरहून अधिकजणांनी या पदासाठी मागणी केली होती. मात्र कोणाला संधी द्यायची या कात्रीत स्थानिक नेत्यांसह पक्षाचे वरिष्ठ देखील अडकले आहेत. परिणामी, मुदत संपेपर्यंतही नावावर एकमत झाले नाही. परिणामी, भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी असे पत्र आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होण्याची शक्यता धूसर झाली आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ… दरम्यान, स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी भाजपकडून महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. स्वीकृत पदांवरून भाजपमध्ये एकमत नसल्याचे सांगत अंतिम यादी जाहीर होईपर्यंत उत्सुकता कायम राहणार असल्याचे चित्र आहे. सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी ही दिवंगत अजितदादांची इच्छा होती. त्याच पाऊलावर पाऊल ठेवक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची नावे सुचवली आहेत. ती आम्ही सादर केली असून अर्जांची छाननी झाली आहे. भाजपने मुदत मागितली असेल तर त्याला आक्षेप घेऊ शकत नाही. – भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते. “अनेकजण इच्छुक आहेत. अद्याप स्वीकृत सदस्यांवर एकमत झाले नाही. त्यामुळे आम्ही मुदत वाढवून मागितली आहे. पुढील महिन्यात नावे सादर करण्यात येतील.” – प्रशांत शितोळे, सत्तारुढ पक्षनेते.