PCMC News – महापालिकेकडून शहरातील २५ टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात असतानाच अवकाळी पावसात भागांत पाणी तुंबल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालेसफाईचे दावे कागदावरच राहिले असून स्थापत्य विभागाच्या अर्धवट आणि विस्कळीत कामांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यांवरच साचत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेली खोदकामे, पेव्हिंग ब्लॉक व काँक्रीटीकरणाची कामे अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे या कामांमध्ये पाण्याच्या नैसर्गिक उताराचा (स्लोप) विचारच न केल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. परिणामी अवकाळी पावसातच मुख्य रस्ते, चौक आणि सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नालेसफाई झाली असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाने मग हे पाणी नेमके कुठे अडले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नाल्यांमध्ये गाळ काढला असला तरी रस्ते कामांमधील नियोजनशून्यता आणि ड्रेनेज लाईनशी योग्य जोडणी न केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. “मार्च महिन्यांत नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. २५ टक्के नाल्यांची सफाई करण्यात आली. मोठ्या नाल्यांसाठी स्पाईडर जेट मशीन उपलब्ध नव्हते. त्यामुळे ते नाले साफ करण्यात आले नव्हते. त्या मशीन उपलब्ध झाल्या की मोठी नाले साफ करण्यात येतील. पाणी तुंबलेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना केल्या आहेत.” – प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका