PCMC News: स्वीकृतसाठी ३२ नावांची यादी; भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवली
नियमानुसार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार

पिंपरी – नऊ महिन्यांपासून भिजत घोंगडे असलेल्या महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून भाजपमधील हालचालींना वेग आला आहे. सात जागांसाठी १५० हून अधिक इच्छुकांमधून स्थानिक पातळीवर ३२ जणांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे.
ती यादी अंतिम निर्णयासाठी वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे आता सात नावांवर कोणाची वर्णी लागणार, याबरोबरच स्वीकृत नगरसेवकांच्या पदांचा कार्यकाळ इच्छुकांमध्ये कसा विभागला जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.
महापालिकेतील संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांपैकी भाजपच्या वाट्याला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला तीन जागा आल्या आहेत. राष्ट्रवादीने सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फजल शेख यांची नावे निश्चित केली आहेत. मात्र, भाजपमध्ये सात जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निवडीचा पेच निर्माण झाला होता.
माजी नगरसेवक, निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा १५० हून अधिक जणांनी या पदांसाठी इच्छा व्यक्त केली होती. इच्छुकांची संख्या आणि पक्षांतर्गत स्पर्धा लक्षात घेता स्थानिक पातळीवर छाननी करून ३२ जणांची नावे वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहेत. आता या यादीतून अंतिम सात जणांची निवड करण्याची जबाबदारी वरिष्ठ नेतृत्वाकडे असेल.
त्याचवेळी स्वीकृत नगरसेवकपदाचा कार्यकाळ इच्छुकांमध्ये विभागण्याबाबतचे सूत्रही निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्थगित सर्वसाधारण सभेत या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलताना सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, स्थानिक पातळीवर ३२ नावांची यादी तयार करून वरिष्ठांकडे पाठवली आहे. वरिष्ठ स्तरावर अंतिम नावे आणि कार्यकाळ वाटपाचे सूत्र निश्चित झाल्यानंतर नियमानुसार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.





