Satara: जिल्हा बँकेच्या सत्तापटलावर शंभूराज ठरले निर्णायक; उपाध्यक्षपद मिळवत मकरंद पाटलांच्या रणनीतीला दिली भक्कम साथ
Satara जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचा पाया मजबूत करण्याचे काम शंभूराज सातत्याने करीत होते. मात्र, सहकाराच्या राजकारणात शिवसेनेचा प्रवेश ही त्यांच्यासाठी मोठी कसोटी होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चार संचालक निवडून आणत त्यांनी ही कसोटी पार केलीच. पण उपाध्यक्षपदावरही पक्षाचा झेंडा फडकवून सहकारातील आपले अस्तित्व अधोरेखित केले. हा केवळ चार संचालकांचा विजय नसून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील नव्या राजकीय शक्तीचा उदय आहे.

Satara: जिल्ह्याच्या राजकारणात शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली. जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता हस्तगत केली. या खेळात शंभूराज देसाई यांची भूमिका निर्णायक ठरली. तब्बल ४५ वर्षांनी पाटणकर गटाचे वर्चस्व दूर करुन जिल्हा बँकेत प्रवेश मिळविणे, स्वतःसह शिवसेनेचे आणखी तीन संचालक निवडून आणणे आणि पक्षाचा उपाध्यक्ष निवडून आणणे, हा शंभूराजेंच्या राजकीय रणनीतीचा मोठा विजय मानला जात आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचा पाया मजबूत करण्याचे काम शंभूराज सातत्याने करीत होते. मात्र, सहकाराच्या राजकारणात शिवसेनेचा प्रवेश ही त्यांच्यासाठी मोठी कसोटी होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चार संचालक निवडून आणत त्यांनी ही कसोटी पार केलीच. पण उपाध्यक्षपदावरही पक्षाचा झेंडा फडकवून सहकारातील आपले अस्तित्व अधोरेखित केले. हा केवळ चार संचालकांचा विजय नसून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील नव्या राजकीय शक्तीचा उदय आहे.
जिल्हा परिषदेच्या जखमेचा जिल्हा बँकेत वचपा?
जिल्हा परिषदेच्या सत्तानाट्यात पोलिसांच्या बंदोबस्ताच्या प्रक्रियेदरम्यान शंभूराज देसाई जखमी झाले होते. त्यानंतर काही जखमा लवकर भरून येत नाहीत, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावेळी या विधानाचा नेमका राजकीय अर्थ काय, याबाबत चर्चा रंगली होती. मात्र, जिल्हा बँकेच्या सत्तानाट्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले आणि या सूचक विधानाचा राजकीय संदर्भ अधिक स्पष्ट झाला. जिल्हा परिषदेतील राजकीय संघर्षाची किनार जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणातही दिसून आली.
उदयसिंह उंडाळकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने या समीकरणाला आणखी राजकीय वजन प्राप्त झाले. उंडाळकर आणि शंभूराज देसाई यांचे जवळचे नातेसंबंधही या नव्या सत्ताव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक ठरले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विश्वासाच्या वर्तुळात एकवटली आहेत. भाजपला मात्र या सत्तावाटपात बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.
भाजपसाठी दिला इशाराच…
जिल्हा बँकेतील या सत्तांतराने साताऱ्यातील महायुतीअंतर्गत मतभे उघड केले आहेत. राज्यात एकत्र सत्तेत असलेले पक्ष जिल्ह्याच्या पातळीवर मात्र एकमेकांना शह देत आहेत. शंभूराज देसाई यांच्या रणनीतीने शिवसेनेला नवी राजकीय ताकद मिळाली आहे. जिल्हा परिषदेतील संघर्षानंतर जिल्हा बँकेत भाजपला बसलेला हा धक्का केवळ एका पदापुरता मर्यादित नाही. आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरविणारा हा संदेश आहे. मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या दोस्तीने राष्ट्रवादी- शिवसेनेचे हात बळकट केले, तर भाजपला आपल्या राजकीय रणनीतीचा फेरविचार करण्याची वेळ आणली. साताऱ्याच्या राजकारणात शंभूराज देसाई आता केवळ सत्तेचे भागीदार राहिलेले नाहीत, तर सत्तेची गणिते बदलण्याची ताकद असलेले धुरंधर खेळाडू म्हणून पुढे आले आहेत.




