PCMC News: दोन दिवसांत शहरातील खड्डे बुजवा! महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश
PCMC News: अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता रोज घेणार आढावा; क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपापल्या भागातील खड्ड्यांची स्वतःहून नोंद घेण्याचे आदेश.

PCMC News – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजविण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रस्ते, पदपथ, रेलिंग, दुभाजक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीला प्रशासनाने प्राधान्य दिले असून, कामांमध्ये दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरातील रस्त्यांची पाहणी करून खड्डे दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची प्रतीक्षा न करता अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून समस्यांची स्वतःहून नोंद घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. खड्डे बुजविताना केवळ तात्पुरती डागडुजी न करता कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि वाहनचालकांची सुरक्षितता याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आहेत.
रस्त्यांसह पदपथ, रेलिंगचीही दुरुस्ती
रस्त्यांबरोबरच रेलिंग, दुभाजकांवरील बॅरिकेड्स, पदपथ तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित इतर सार्वजनिक सुविधांचीही पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय कामांचे नियोजन करून प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. प्रत्येक विभागीय कार्यकारी अभियंता,
उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व सार्वजनिक सुविधांच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्तेची तपासणी यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम न झाल्यास जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.
दररोज होणार कामांचा आढावा
अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि सह शहर अभियंता यांनी दुरुस्तीच्या कामांचा नियमित आढावा घ्यावा, तसेच क्षेत्रीय कार्यालयनिहाय खड्डे, रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या कामांची दररोज प्रगती तपासून अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“खड्डे आणि सार्वजनिक सुविधांची दुरुस्ती तातडीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावी. तक्रारींची प्रतीक्षा न करता अधिकाऱ्यांनी स्वतःहून पाहणी करावी. दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका






