प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला असल्याचे समोर आले आहे.शहरातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये इतर प्रभागातील तब्बल ४ हजार ६५४ मतदार घुसवत गैरकारभाराचा कळस गाठला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्रभाग २६ मध्ये दुसऱ्या प्रभागातील ४ हजार ६५४ मतदार हे प्रभाग २३, २४ आणि २५ मधील घुसवले आहेत. तसेच १८९७ दुबार मतदार आहेत. प्रभाग क्रमांक २६ ची वास्तविक मतदारसंख्या कृत्रिम रित्या फुगवली गेली आहे. त्यामुळे प्रभागातील मतदारांचे प्रतिनिधित्व असंतुलित होत असून निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास ढासळत चालला आहे. प्रभागातील चुकीने समाविष्ट झालेले सर्व मतदार तात्काळ वगळावेत. संबंधित मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागात पुनर्स्थापित करावीत. ही चूक कशी आणि कुणाकडून झाली याची सखोल चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी. अशा गंभीर चुका निवडणूक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. नागरिकांच्या मताधिकाराचा आदर राखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता टिकवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलून सुधारणा करावी अन्यथा प्रशासनाला नागरिकांचा जनआंदोलनाला सामोरे जावे लागले असा इशारा काळे यांनी दिला आहे.