PCMC News – प्रत्येक घरात वेळोवेळी साफसफाई करताना जुनी खेळणी, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर अशा अनेक वस्तू बाहेर टाकल्या जातात. या वस्तू रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने शहराचे सौंदर्य बाधित होते आणि कचऱ्याचे प्रमाण वाढते. मात्र, या वस्तू योग्य पद्धतीने संकलित करून गरजूंपर्यंत पोहोचवल्यास त्यांचा पुनर्वापर होऊन समाजालाही मदत होते. सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील विविध प्रभाग स्तरावर आर.आर.आर. (रिड्यूस, रियुज, रिसायकल) केंद्रे सुरू केली आहेत. तरी नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू आर.आर.आर. केंद्रात जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाकडून शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत विविध ठिकाणी आर.आर.आर. केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये नागरिकांनी घरातील न वापरता ठेवलेल्या पण चांगल्या स्थितीतील वस्तू जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमा झालेल्या वस्तूंचा गरजूंपर्यंत पुनर्वितरण केले जाते. त्यामुळे शहर स्वच्छ राहते, कचऱ्याचे प्रमाण घटते आणि समाजात पुनर्वापराची जाणीव वाढते. या उपक्रमामुळे वापरात नसलेल्या वस्तूंचा योग्य पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीद्वारे पर्यावरणावर होणारा ताणही घटतो. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधला जात आहे. आपण आर.आर.आर केंद्रात या वस्तू जमा करू शकता पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, चांगल्या स्थितीतील कपडे, चादरी, पडदे, खेळणी, शैक्षणिक साधने, घरगुती साहित्य, भांडी, फर्निचर, छोटे-मोठे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या इतर वस्तू.