PCMC Mayor : पिंपरी-चिंचवडचा नवा कारभारी कोण? आज ‘अर्ज’ भरताना होणार नावाची घोषणा; भाजपच्या भुमिकेकडे लक्ष
PCMC Mayor : आज दुपारी ३ ते ५ या वेळेतच कळणार भाजपचा 'चेहरा'; नगरसचिव कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी.

PCMC Mayor – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत स्थायी समितीसह विविध ५ विशेष समित्यांच्या सदस्यांची देखील नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि. २) दुपारी ३ ते ५ या वेळेत महापौर व उपमहापौर पदासाठी नगरसचिव कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
या अर्ज स्वीकृतीवेळी भाजप कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालणार हे स्पष्ट होणार आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या पदासह उपमहापौर पदाची निवड विशेष सभेत केली जाणार आहे. याबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून सहकार आयुक्त दिपक तावरे काम पाहणार आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावली जाते. यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेची विशेष सभा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या सभेत महापौर व उपमहापौर यांच्यासह स्थायी समिती व विविध ५ विशेष समितीच्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
नामनिर्देशन पत्राचे छापील अर्ज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या नगरसचिव कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळतील. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सोमवारी दुपारी ३ ते ५ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र नगरसचिव कार्यालयात विहित वेळेत स्वीकारली जाणार आहेत, असे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.





