PCMC Election: एबी फॉर्म गहाळ प्रकरण भोवलं; निवडणूक अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली..नेमकं प्रकरण काय?

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला चिन्ह वाटपात राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह द्यावे लागले. या प्रकरणात एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची बदली करण्यात आली आहे.राष्ट्रवादीच्या प्रभाग क्र. १६ ब जागेवरील उमेदवार जयश्री भोंडवे या उमेदवाराचा एबी फॉर्म पाटील यांच्याकडून गहाळ झाला.
यात स्वतःची चूक असताना ही पाटील यांनी छाननीवेळी त्यांना अपक्ष उमेदवार ठरवले. या विरोधात संबधित उमेदवाराने उच्च न्यायालयात धाव घेतली. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी, तसेच इतर तांत्रिक पुरावे सादर केले. यात तथ्य असल्याचे पाहून न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे पुरावे तपासण्यासाठी स्वतंत्र सुनावणीचे आदेश दिले. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशी तातडीने सुनावणी घेतली. यावेळी उमेदवाराने एबी फॉर्म वेळेत सादर केला हे त्यांच्या ही निदर्शनास आले.
त्यामुळे आयुक्त हर्डीकरांनी उमेदवाराचा एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळे अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या त्या उमेदवाराला पक्षाचे अधिकृत घड्याळ चिन्ह दिल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र हा घोळ ज्यांच्यामुळे झाला. ते निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची आता बदली करण्यात आली आहे. या संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही माध्यमांशी बोलताना बदली केल्याचे सांगितले आहे.





