PCMC Election : चिंचवडमध्ये फ्लेक्सवॉर! जनसंवाद नेत्यांचा अन् चमकोगिरी इच्छुकांची

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – येत्या काही महिन्यांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांकडून सध्या शहरात जनसंवाद सारख्या जनसंपर्क वाढविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी करत प्रसिद्धी मिळवण्यासोबतच नेत्यांवर छाप पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.
सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फ्लेक्सबाजी करत इच्छुकांनी चमकोगिरी सुरू केली आहे.मागील साडेतीन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालविला जात आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडूनही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे खर्च टाळण्यासाठी मागील दोन-अडीच वर्षे फ्लेक्स व सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणारे सर्वपक्षीय इच्छुक आता पुढील काही महिन्यांत निवडणूक होणार असल्याने ॲक्टिव्ह मोडवर आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय इच्छुकांकडून छोटी-मोठी कारणे शोधली जात आहेत.
या निमित्ताने फ्लेक्स व इतर माध्यमातून प्रसिद्धीची संधी साधली जात आहे. मतदारांसह उमेदवारी देण्याच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आपल्या नेत्यावर छाप पाडण्यासाठी आणि उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी नाना प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.येत्या बुधवारी (दि. १५) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने चिंचवड विधानसभेतील रहाटणी याठिकाणी जनसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने चिंचवड विधानसभा क्षेत्रातील इच्छुकांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजी केली आहे. विशेष म्हणजे यामधील बहुतांश जणांनी महापालिकेकडून यासाठी आवश्यक असणारी परवानगी घेतली नाही. चौक, रस्त्यांच्या कडेला, पदपथांवर अनधिकृत बॅनर लावल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.
नेत्यांनी फ्लेक्सबाबत व्यक्त केली नाराजी..
अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होते, पदपथावर व रस्त्यांच्या कडेला उभारलेल्या फ्लेक्समुळे नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण होतो, त्यामुळे रोष पत्कारावा लागतो, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो अनधिकृत फ्लेक्स लावतो तो कामच करत नाही असा टोला देखील लगावला होता. मात्र, तरीही नेत्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत मोठ्याप्रमाणवर फ्लेक्सबाजी केली जात आहे.
दिवाळीच्या निमित्ताने फ्लेक्सचे पीक..
गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील माजी नगरसेवक व इच्छुक सण, समारंभ व नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर फ्लेक्स लावत आहेत. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, कोजागिरी या सणांसाठी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावले होते. आता दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने शहरभरात फ्लेक्स लावण्यास सुरूवात झाली आहे.





