PCMC Election: निवडणुकीमुळे संगीतकारांचे चांगभलं; पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचारगीत बनवण्याचा उद्योग जोरात

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत यश मिळविण्यासाठी शहरातील उमेदवार आता पारंपरिक सभांसोबत ‘प्रचारगीतांचे बळ’ही वापरण्याच्या तयारीत आहेत. आकर्षक धून, तरुणांना भावेल असे शब्द आणि सोशल मीडियावर व्हायरल होईल अशी रचना यावर भर देत जेन-झी पिढीची मदत घेतली जात आहे. यामुळे संगीतकारांच्या स्टुडिओसमोर उमेदवारांची गर्दी वाढू लागली आहे.
महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंग घेत असताना पिंपरी–चिंचवडमधील अनेक संभाव्य उमेदवारांनी प्रचारासाठी खास गीते बनविण्याची मोहीम सुरू केली आहे. तिकीट मिळण्याची खात्री असलेल्या उमेदवारांनी आधीच स्टुडिओचे रस्ते धरले असून, प्रचारगीत अधिकाधिक लोकप्रिय व्हावे यासाठी तरुणांच्या कल्पकतेचा आधार घेतला जात आहे.
प्रचारगीते ही केवळ तालबद्ध नारे नसून उमेदवाराची प्रतिमा, त्यांचा कामकाजाचा आढावा, प्रभागातील विकासकामांचा उल्लेख आणि भविष्यातील आश्वासने या सर्व गोष्टींचे ‘ऑडिओ-ब्रँडिंग’ म्हणून ती वापरली जात आहेत. ही गाणी रिक्षांमधून, मिरवणुकांतून, सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲप स्टेटसवरून सतत कानावर पडत असल्याने त्याचा सरळ परिणाम मतदारांवर होत असल्याचा उमेदवारांचा विश्वास आहे.
प्रचारगीतांची परंपरा व बदल पूर्वी पारंपरिक ढंगातील गाणी तयार केली जात असत. आता डिजिटल मिक्सिंग, रिमिक्स बीट, छोट्या व्हिडिओ क्लिप्स, यूट्यूब–इंस्टाग्राम रील्स यामुळे प्रचारगीतांचा आवाका वाढला आहे. काही ठिकाणी तर उमेदवारांचे पूर्ण राजकीय प्रवासच गाण्यात मांडले जात आहेत. केवळ स्तुतीपर शब्दांनी भरलेले गीत नव्हे तर मतदारांशी नाते जोडेल अशा भावनेचे गीत प्रभावी ठरते.
त्यामुळे “प्रचार करा आणि जिंका” या पारंपरिक सूत्रासोबत आता “प्रचारगीत गुंजवा आणि मन जिंका” हे नवे समीकरण आकार घेताना दिसत आहे. निवडणुकीची सरगर्मी वाढत असताना पुढील काही दिवसांत पिंपरी–चिंचवडमध्ये आणखी नवे सूर, नवी गाणी आणि त्याचबरोबर राजकीय चुरस अधिक रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. संगीतकारांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक उमेदवाराला वेगळी ओळख देणारी स्वतंत्र चाल तयार केली जाते.
प्रचारगीतांचे मानधन आणि ‘इंडस्ट्री’
पिंपरी–चिंचवडमध्येही प्रचारगीत निर्मिती एक वेगळी ‘इंडस्ट्री’ बनू लागली आहे. एका गाण्यासाठी ५० हजार ते एक लाख रुपये मानधन आकारले जात असल्याची माहिती संगीत क्षेत्रातून मिळते. शहरात काम करणाऱ्या अनेक स्थानिक कलाकारांना त्यामुळे चांगल्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
तरुणांच्या कल्पकतेला मागणी
नव्या पिढीतील तरुण मुलामुलींचे समाजमाध्यमांवरील प्रभुत्व लक्षात घेऊन उमेदवार त्यांची साथ घेत आहेत. व्हिडिओ रील, रॅप-स्टाइल गीत, डीजे बीट यांचा वापर करून गाणी ‘ट्रेंडी’ बनविली जात आहेत. अनेक उमेदवार प्रचारगीत तयार करण्यासाठी स्टुडिओत जाताना आपले पुत्र, पुतणे किंवा तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे.





