प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी विधानसभानिहाय उमेदवारांचा आढावा घेतला असून, उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. २८) प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती पिंपरी चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी दिली. आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले, पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी आम्ही प्रदेश कार्यालयाकडे पाठविली आहे . मुंबईत या संदर्भात बैठक झाली. बैठकीला सर्व कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. उमेदवारांचा विधानसभा निहाय आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारी निश्चित आहे त्या नावांना अंतिम मान्यता देण्यात आली असली तरीही अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींचाच असणार आहे. त्यानुसार प्रदेश आणि कोअर कमिटी याबाबत निर्णय घेईल. भारतीय जनता पक्षामध्ये सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेळोवेळी न्याय देण्यात येतो हा इतिहास आहे. कुठल्याही परिस्थितीत निष्ठावंत कार्यकर्त्यावर पक्षाकडून अन्याय होत नाही त्यामुळे उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरही कोणत्याही प्रभागात नाराजी दिसून येणार नाही. सर्वेक्षणानुसार विजयाची क्षमता असणारे उमेदवार निवडण्यात येणार आहेत ही भाजपची रणनीती आहे. त्यानुसारच पक्षश्रेष्ठींकडून उमेदवार यादी अंतिम करण्यात येत आहे.