PCMC Action : महापालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! २४ सोसायट्यांचे पाणी केले बंद…धक्कादायक कारण समोर
PCMC Action : वारंवार नोटिसा देऊनही नियम न पाळणे भोवले; १२५ पैकी ९९ सोसायट्यांना पालिकेचा दणका, २४ सोसायट्यांचे पाणी तोडले.

PCMC Action – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आलेल्या खाजगी मैलाशुद्धीकरण केंद्रांच्या (एसटीपी) कार्यान्वयनाबाबत महापालिकेकडून सातत्याने पाठपुरावा आणि कारवाई सुरू आहे. ज्या सोसायट्यांमध्ये एसटीपी सुरू नाहीत, अशा सोसायट्यांवर कारवाईचा बडगा महापालिका प्रशासनाने उचलला आहे. अशा २४ सोसायट्यांचे नळजोड तोडत महापालिकेने कठोर कारवाई केली आहे.
शहरात सध्या एकूण १०६ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची ४९४ खाजगी मैलाशुद्धीकरण केंद्रे बांधण्यात आली आहेत. त्यापैकी ८३ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची ३६९ मैलाशुद्धीकरण केंद्रे कार्यान्वित असून २३ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची १२५ केंद्रे अद्याप कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यरत नसलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्रांना सुरू करण्यासाठी संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत तांत्रिक सहाय्य करण्यात येत आहे.
तसेच ही केंद्रे कार्यान्वित करण्याबाबत १२५ पैकी ९९ सोसायट्यांस पालिकेमार्फत प्रथम, द्वितीय व तृतीय नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये विकसकांकडून मैलाशुद्धीकरण केंद्रांचे सोसायट्यांना हस्तांतरण करण्यात अडचणी येत असल्याने अशा सोसायट्यांच्या बाबतीत पर्यावरण विभागामार्फत सुनावण्या घेऊन मार्ग काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, प्रथम ते तृतीय नोटीस देऊनही ९९ सोसायट्यांकडून मैलाशुद्धीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली नाहीत.
मैलाशुद्धीकरण केंद्रे बंद असल्यामुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर होत नसून फ्लशिंग, गार्डनिंग यांसारख्या पिण्याव्यतिरिक्त वापरासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. तसेच काही सोसायट्यांकडून सांडपाणी थेट अथवा पंपाच्या सहाय्याने नजीकच्या नाल्यात, स्टॉर्म वॉटर लाईनमध्ये किंवा महापालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात वाढ होत असून पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
६२ सोसायट्यांमध्ये नाही एसटीपी कार्यान्वित
महापालिकेमार्फत कार्यान्वित नसलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्रांची तसेच नाल्यात अथवा स्टॉर्म वॉटर लाईनमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या सोसायट्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना आणि नोटिसा देऊनही आवश्यक कार्यवाही न केल्यामुळे पहिल्या टप्प्यात मैलाशुद्धीकरण केंद्रे बंद असलेल्या ६२ पैकी २४ सोसायट्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे.
तसेच ४ सोसायट्यांकडून मैलाशुद्धीकरण केंद्रे कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. ३ सोसायट्यांमध्ये मैलाशुद्धीकरण केंद्रे कार्यान्वित असल्याचे आढळून आल्याने त्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आलेले नाही. तर ३ सोसायट्यांमध्ये संबंधित केंद्रे अद्याप विकसकांकडून सोसायटीकडे हस्तांतरित न झाल्यामुळे अशा विकसकांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.






