PCIFF 2026 – पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ आणि भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII) यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे संपन्न होणार आहे. यंदाच्या महोत्सवात तब्बल ४३ देशांतील ११६ चित्रपट प्रदर्शित होणार असून लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि दीर्घपट अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. भारतासह अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, इराण, दक्षिण आफ्रिका आदी देशांतील दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद शहरातील चित्रपटप्रेमींना घेता येणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे.चित्रपटांमधून समाजमनाला स्पर्श करणारे विषय प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. विज्ञान व अंधश्रद्धा, समाजव्यवस्था, पर्यावरण व हवामान बदल, तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, मानवी मूल्ये, मानसिक आरोग्य, बालहक्क, ग्रामीण विकास, उद्योजकता, कला-संस्कृती संवर्धन आणि जागतिक शांतता अशा विषयांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. महिला दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बुधवार, दि. ५ मार्च रोजी पारितोषिक वितरण समारंभात विविध स्पर्धा विभागांतील उत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करण्यात येईल.महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणून ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाचे ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. मराठी माध्यमातील शिक्षणव्यवस्था आणि भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करेल. शहराच्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालणारा हा उपक्रम असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.तसेच पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीचे संस्थापक दत्ता गुंड यांनीही हा महोत्सव सांस्कृतिक संवाद घडवणारा असल्याचे सांगितले आहे.