PBKS vs RR : पंजाबला हरवणाऱ्या राजस्थानच्या खेळाडूला प्रीती झिंटाने मारली मिठी, VIDEO होतोय व्हायरल

PBKS vs RR Preity Zinta hugs Sandeep Sharma video viral : आयपीएल २०२५ मध्ये अखेर पंजाब किंग्जची विजयी मालिकाही खंडित झाली. दोन विजयांसह हंगामाची दमदार सुरुवात करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या संघाला तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यात राजस्थानने त्यांचा ५० धावांनी पराभव केला. यानंतर पंजाब फ्रँचायझीची सह-मालकीन अभिनेत्री प्रीती झिंटाने राजस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूची गळाभेट घेत कौतुक केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंजाब आणि राजस्थान यांच्यातील हा सामना शनिवार ५ एप्रिल रोजी खेळला गेला आणि हा सामना पंजाब किंग्जच्या घरच्या मुल्लानपूरमध्येही झाला. या मैदानावर आयपीएल २०२५ चा हा पहिला सामना होता आणि प्रीती झिंटा देखील तो पाहण्यासाठी हजर होती. ती दरवर्षी संघाचे सामने पाहण्यासाठी येते, पण या हंगामात ती पहिल्यांदाच सामना पाहण्यासाठी आली होता. तिच्या उपस्थितीत घरच्या संघाला यंदाच्या हंगामातील पहिल्याच पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रीती झिंटाने राजस्थानच्या खेळाडूची घेतली गळाभेट –
https://twitter.com/rajasthanroyals/status/1908794238260621333
या पराभवानंतरही, प्रीतीने नेहमीप्रमाणे तिच्या खेळाडूंना प्रेमाने भेटून त्यांना प्रोत्साहन दिले. पण फक्त तिच्या खेळाडूंनाच नाही तर तिने राजस्थान रॉयल्सचा मध्यमगती गोलंदाज संदीप शर्माचीही तितक्याच प्रेमाने भेट घेतली. राजस्थान रॉयल्सने संदीप आणि प्रीतीच्या भेटीचा एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. यावेळी, प्रीतीने संदीपची विचारपूस केली आणि काही महिन्यांपूर्वी जन्मलेल्या त्याच्या दुसऱ्या मुलाबद्दलही विचारपूस केली.
हेही वाचा – Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज! जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होऊन संघात दाखल
पंजाबला हरवण्यात संदीप शर्माने बजावली महत्त्वाची भूमिका –
प्रीती झिंटाने संदीपला अशा प्रकारे भेटणे चाहत्यांना खूप आवडले. या सामन्यात राजस्थानच्या विजयात संदीपने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने ४ षटकांत फक्त २१ धावा दिल्या आणि मार्कस स्टोइनिससह २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तरीही प्रितीचा संदीपबद्दलचा दृष्टिकोन असा आहे. कारण काही हंगामांपूर्वीपर्यंत संदीप पंजाब किंग्जचा भाग होता, जिथे त्याने ६ हंगाम घालवताना पंजाब किंग्ज संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.





