Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज! जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होऊन संघात दाखल

Jasprit Bumrah returns to MI team for IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिलेली नाही. संघाने चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन गमावले असून एक जिंकला आहे. त्यामुळे हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. आता हंगामाच्या मध्यभागी, मुंबई संघासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात सामील झाला आहे. बंगळुरुमधील सेंटर ऑफ एक्सलन्समधील बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर तो मुंबई संघाशी जोडला गेला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये झाली होती दुखापत –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत होता. या कारणास्तव, तो चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होऊ शकला नाही. ईएसपीएन क्रिकइंफोच्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह संघात सामील झाला असला, तरी तो ७ एप्रिल रोजी आरसीबी विरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. तो त्याच्या रिकव्हरीनंतर सावध सुरुवात करणार आहे. दरम्यान तो संघात सामील झाल्याची बातमी मुंबई संघाने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन दिली.
The King of the jungle is back in his kingdom 🦁🔥#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/oZMIiSiEm5
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2025
बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईने तरुण गोलंदाजांना आजमावले –
ईएसपीएन क्रिकइंफोच्या अहवालात म्हटले आहे की जसप्रीत बुमराह आता तंदुरुस्त आहे. त्याच्या अनुपस्थितीत, मुंबई इंडियन्सने चालू हंगामात सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर आणि अश्विनी कुमार सारख्या तरुण गोलंदाजांना आजमावले आहे. जसप्रीत बुमराह २०१३ पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे आणि त्याने आतापर्यंत १३३ सामन्यांमध्ये १६५ आयपीएल विकेट्स घेतल्या आहेत.
बुमराहच्या आगमनाने मुंबईची वाढली ताकद –
जसप्रीत बुमराह त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याचा यॉर्कर चेंडू अतुलनीय आहे. त्याने एकट्याने मुंबई इंडियन्स संघासाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. आता त्याच्या संघात येण्याचा फायदा मुंबई संघाला नक्कीच होईल. मुंबईचा पुढील सामना ७ एप्रिल रोजी आरसीबीविरुद्ध होईल. यानंतर, संघ १३ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळेल. या सामन्यात बुमराह मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसू शकतो.





