Paytm Share Price| पेटीएमच्या शेअरला लोअर सर्किट

Paytm Share Price | पेटीएमची पालक कंपनी असलेल्या One 97 Communications Ltd या कंपनीच्या शेअर चा भाव घसरणे चालूच राहिले. मंगळवारी या कंपनीच्या शेअरचा भाव दहा टक्क्यांनी कोसळला त्यामुळे या शेअरला सर्किट लावावे लागल. या कंपनीबाबत रिझर्व्ह बँकेने जो निर्णय घेतला आहे त्याचा फेरविचार केला जाणार नाही असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी काल सांगितले होते.
काल रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी अर्थसंकल्पाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांनी शक्तीकांत दास यांना यासंदर्भात विचारणा केल्या असता दास यांनी सांगितले की, आम्ही प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेत असतो. पेटीएम बाबत घेतलेला निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला आहे. त्यामुळे या निर्णयावर फेरविचार केला जाण्याची कसलीही शक्यता नाही. आज या कंपनीच्या शेअरचा भाव दहा टक्क्यांनी कोसळल्यामुळे आता या शेअरचा भाव 380 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला आहे.
सध्या या कंपनीच्या शेअरचा भाव 52 आठवडाच्या निचांकी पातळीवर आहे. 31 जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेने एटीएम पेमेंट बँकेला आगामी काळात ठेवी स्वीकारता येणार नाहीत असे सांगितले आहे. त्याचबरोबर इतर काही निर्बंध घातले आहेत. या कंपनीच्या सेवा मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. त्यामुळे विविध घटकावर याचा काय नकारात्मक परिणाम होईल याबाबत चर्चा चालू आहे.
यावर बोलताना दास यांनी सांगितले होते की, फिनटेक कंपन्या वाढाव्या अशी रिझर्व्ह बँकेची इच्छा आहे. आगामी काळातही या कंपन्यांना मदत केली जाईल. मात्र सांगूनही चुकीचे काम केल्यानंतर अशा कंपन्याविरोधात कारवाई करणे आवश्यक असते. कारण त्यामुळे एकूण वित्तीय व्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
भारताची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. वित्तीय व्यवस्था बळकट आहे. या घडामोडीमुळे भारताच्या वित्तीय व्यवस्थेवर कसलाही परिणाम होणार नाही याचा पुनरुच्चार दास यांनी केला. त्याचबरोबर यासंदर्भात ग्राहकांना जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देणारे निवेदन लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे दास यांनी सांगितले आहे.
पेटीएम कंपनीसह इतर कंपन्यांनी आणि स्टार्ट अपनी कारवाई मवाळ करावी असे सूचना अर्थ मंत्रालय व रिझर्व्ह बँकेला केली होती. मात्र या सूचनाकडे रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आगामी काळात पेटीएम कंपनीबाबत काय घडामोडी होतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. निर्बंधाची अंमलबजावणी या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे.



