Paytm Share price: मंगळवारी पेटीएमचा शेअर 8 टक्क्यांनी वाढला..

मुंबई – गेल्या तीन दिवसापासून पेटीएम कंपनीच्या शेअरचा भाव ( Paytm Share price) मोठ्या प्रमाणात कोसळला होता. मात्र मंगळवारी पेटीएम कंपनीची पालक कंपनी असलेल्या वन नाईन सेव्हन कम्युनिकेशन या कंपनीच्या शेअरच्या भावात जवळजवळ आठ टक्क्याची वाढ नोंदली गेली.
मंगळवारी या कंपनीच्या शेअरचा भाव आठ टक्क्यांनी वाढून 472 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. यामुळे या कंपनीच्या बाजार मूल्यात 852 कोटी रुपयांची वाढ झाली. आता या कंपनीचे बाजार मूल्य 28,680 कोटी रुपये इतके आहे. मात्र गेल्या तीन दिवसात या कंपनीच्या शेअरला लोअर सर्किट लावावे लागले होते.
तसेच लोअर सर्किटची मर्यादाही कमी करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला 29 फेब्रुवारी पासून नवीन ठेवी स्विकारण्यास मनाई केली आहे. वन नाईन सेव्हन या कंपनीचे पेटीएम बँकेमध्ये 49 टक्के भाग भांडवल आहे. त्याचबरोबर या कंपनीचे संस्थापक विजय शंकर शर्मा यांचे पेटीएम बँकेत 51 टक्के इतके भाग भांडवल आहे.
पेटीएम बँकेचा पेच प्रसंग अजून संपुष्टात आला नसला तरी आज या शेअरची खरेदी का झाली याबाबत चर्चा चालू आहे. काही माध्यमानी पेटीएम बँक रिलायन्स इंडस्ट्रीज खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे असे वृत्त दिले होते.मात्र नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने या वृत्ताचा इन्कार केला.
आता या बँकेचे शेअर यापेक्षा जास्त कोसळणार नाहीत. या बँकेची खरेदी इतर कुठलीतरी मोठी बँक करेल आणि त्यामुळे दीर्घपल्ल्यात आपल्याला फायदा होईल अशा दृष्टिकोनातून काही गुंतवणूकदारांनी पेटीएम बँकेच्या शेअरची खरेदी केली असे काही विश्लेषक मानतात.
देशभरातील व्यापार्यांनी या घडामोडीकडे लक्ष द्यावे आणि पेटीएमला पर्याय म्हणून इतर सुविधांचा वापर करण्याच्या शक्यतेवर विचार करावा असे व्यापार्यांच्या संघटनेने रविवारी सांगितले होते. त्यानंतर आता इतर पेमेंट बँका या संधीचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वातावरण सध्या आहे. भारतात डिजिटल पेमेंट क्षेत्रात पेटीएमने क्रांती केली होती. 2026 पर्यंत डिजिटल पेमेंट यंत्रणा दहा लाख कोटी डॉलरची होईल असे समजले जात आहे.
मात्र रिझर्व्ह बँकेने अचानक या बँकेच्या कारभारावर मर्यादा आणल्यामुळे या क्षेत्रात उलट सुलट चर्चा चालू झाली आहे. पेटीएमचे सध्या देशात दहा कोटी ग्राहक आहेत. दक्षिणेतील काही राज्यांमध्ये व्यापार्यांनी पेटीएमचे क्युआर कोड बाजूला ठेवले आहेत आणि रोखीत व्यवहार करण्याची सूचना ग्राहकांना केली आहे.




