Paytm Share Price: पेटीएमसाठी पुन्हा आले ‘अच्छे दिन’; 3 दिवसात 16 टक्क्यांनी वाढला शेअर

Paytm Share Price: फिन्टेक कंपनी पेटीएमने त्यांच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत सर्वात वाईट घसरण पाहिली. मात्र, आता पेटीएमच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. Paytm ची मूळ कंपनी, One 97 Communications Ltd चे शेअर्स गेल्या 3 ट्रेडिंग सत्रांमध्ये 16 टक्क्यांनी वाढले आहेत. गेले तीन दिवस सतत पेटीएमचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला आहेत. शेअर्सच्या वाढीमुळे फिनटेक कंपनीचे बाजार भांडवल (MCap) दोन दिवसांत 23,900 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे.
स्टॉक मार्केट 5% अपर सर्किट –
मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी, शेअर बाजारातील सुरुवातीलाच पेटीएमचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्येही पेटीएमचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर पोहोचले होते. आजच्या व्यवहारात पेटीएमचे शेअर्स बीएसईवर 4.99 टक्क्यांनी वाढून 376.45 रुपये प्रति शेअरवर बंद झाले. तर गेल्या तीन दिवसांत पेटीएमचा शेअर 16 टक्क्यांनी वाढला आहे.
पेटीएम शेअर्स वाढण्यामागे कारण काय ?
-RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला दिलेली 15 दिवसांची मुदतवाढ.
-पेटीएमच्या अधिकाऱ्यांनी अलीकडे केलेले सकारात्मक विधान.
-ईडीने सुरू केलेल्या संभाव्य परकीय चलन उल्लंघनाच्या तपासात कोणतेही गैरप्रकार उघड झाले नाही.
-16 फेब्रुवारी रोजी पेटीएमने आपले मुख्य खाते पेटीएम पेमेंट्स बँकेतून ॲक्सिस बँकेत हस्तांतरित केले.
-या ताज्या घडामोडींमुळे, पेटीएमवरील गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा एकदा परतताना दिसत आहे.
दरम्यान, ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनने पेटीएमला प्रति शेअर 600 रुपयांच्या लक्ष्य मूल्यासह ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिले आहे. ब्रोकरेजनुसार, RBI ची कारवाई प्रामुख्याने Paytm पेमेंट्स बँकेला (PPBL) लागू होते, पेटीएमच्या इतर अविभाज्य ऑपरेशन्समध्ये व्यत्यय आणण्याच्या हेतूने नाही. कंपनीवर परिणाम करणाऱ्या नियामक उपायांची व्याप्ती समजून घेण्यासाठी हा फरक महत्त्वाचा आहे. त्यात म्हटले आहे की, व्यापाऱ्यांचे कामकाज पीपीबीएल नसलेल्या बँकेशी जोडणे हे एक “प्रमुख सकारात्मक” पाऊल आहे.




