Nagar : सोयाबीन खरेदीचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा – सभापती रोहोम

कोपरगाव : शासनाने सन 2024-25 करिता सोयाबीन या शेतीमालाचा आधारभूत दर 4,892 रूपये जाहीर केला आहे. कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगावच्या मुख्य मार्केट यार्ड या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेले आहे. तेथे शासनाच्या सन 2024-25 या वर्षाकरिता आधारभूत दर 4,892 रुपये या प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे. सध्या सोयाबीनचे भाव पडलेले असल्याने यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पहिल्या टप्प्यात कृषि उत्पन्न बाजार समिती कोपरगावच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर 37 शेतकरी वर्गाने 636 क्विंटल (1272 गोणी) सोयाबीन शेतमाल विक्री केलेला असून, त्याचे पेमें 4,892 रक्कम रुपयाने 31,11,312 शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती सभापती साहेबराव रोहोम व उपसभापती गोवर्धन परजणे यांनी दिली. सोयाबीन ऑनलाईन नोंदणीची मुदत दि. 31 डिसेंबर 2024 असून, बाजार समितीत आजअखेर 900 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन ऑनलाईन नोंदणी करिता कागदपत्रांची बाजार समितीकडे पूर्तता करावी तसेच सोयाबीन ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकरी वर्गाने आपला सोयाबीन शेतमाल विक्रीस आणताना काडी कचरा, माती विरहीत, बुरशी व जाळी नसलेला, FAQ दर्जाचा शेतमाल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांनी केले आहे.





