Pune District : अजितदादांच्या स्मृतीला शिक्षणातून अभिवादन; शिष्यवृत्ती मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा व आयएसआरओ-नासा तयारीवर भर
Pune District : या उपक्रमांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम करणे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि जिल्हा परिषद शाळांबद्दलचा पालकांचा व समाजाचा विश्वास अधिक दृढ करणे हा आहे.

पौड : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी ’अजितदादा स्मृती पर्व’ या वर्षभर चालणार्या शैक्षणिक उपक्रमांची घोषणा करण्यात आली. मा. आमदार शंकरदादा मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य मिलिंददादा वाळंज यांच्या पुढाकारातून पौड-आंबडवेट गटातील जिल्हा परिषद शाळांमध्ये हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन पुस्तके, आयएसआरओ-नासा परीक्षा तयारीसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग, अभ्यासदौरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम तसेच जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बनविण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम करणे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि जिल्हा परिषद शाळांबद्दलचा पालकांचा व समाजाचा विश्वास अधिक दृढ करणे हा आहे.
यावेळी आयोजकांनी सांगितले की, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी शिक्षण, ग्रामीण विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत त्यांच्या विचारांचा वारसा कृतीतून पुढे नेण्याचा संकल्प या उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अजितदादा स्मृती पर्व’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध शैक्षणिक, बौद्धिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार असून, या उपक्रमाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.





