प्रभात वृत्तसेवा खेड – ऊस गाळपात आपण एक नंबर राहिलो आणि दरातही जिल्ह्यात पहिला नंबर मिळवू,” असे अंबालिका साखर कारखान्याचे प्रशासन आणि अजित पवार यांनी दिलेले आश्वासन पाळावे, शेतकऱ्यांना प्रति टन ३०० रुपये अंतिम बिल द्यावे, अन्यथा कारखान्याचे चाकही फिरू देणार नाही, ऊस तोडणीसाठी तालुक्यात गावबंदी करू, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.दिवाळी तोंडावर आली असतानाही अंबालिका शुगरने अद्याप अंतिम बिल घोषित केलेले नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीच्या वतीने अंबालिका प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी अंबालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. तालुक्याच्या शेजारील इतर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजारांहून अधिक दराने अंतिम बिल जमा केले असताना अंबालिकाने मात्र अद्याप निर्णय न घेणे शेतकऱ्यांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण करणारे ठरले आहे.गौरी शुगर हिरडगाव कारखान्याने प्रति टन ३१०१ रुपये दराने अंतिम बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. बारामती ॲग्रोनेही अंतिम बिलाचा १०० रुपये दर जाहीर करून प्रति टन २९०० रुपये इतका दर दिला. मात्र अंबालिका शुगरने अद्याप प्रति टन २८०० रुपयांवरच गाळप दर थांबवला आहे. त्यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या आशेवर अक्षरशः पाणी फेरले आहे.अंबालिका शुगरकडून शेतकऱ्यांना केवळ पाच किलो साखर वाटून ‘तोंड गोड’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण दिवाळीपूर्वी अपेक्षित रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार असल्याचे चित्र दिसते. या भागातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी अंबालिका शुगर, बारामती ॲग्रो आणि गौरी शुगरवर आजवर विश्वास ठेवून ऊस पुरवठा केला आहे. मात्र, या वर्षीच्या कारखान्यांच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांतून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अन्यथा ‘चटणी-भाकर’ खाऊन ‘काळी दिवाळी’ ‘अंतिम बिलाचा दर जाहीर न केल्यास येत्या मंगळवारी (दि. २१) अंबालिका साखर कारखान्याच्या ठिकाणी शेतकरी कृती समितीच्या वतीने शेतकरी एकत्र येऊन ‘चटणी-भाकर’ खाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी करणार आहेत. कारखान्याच्या विरोधात ही कृती म्हणजे शेतकऱ्यांचा संताप व्यक्त करण्याची भूमिका असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.