पुणे जिल्हा | धनादेश न वटल्याने 75 हजारांची नुकसानभरपाई द्या

काटेवाडी (वार्ताहर) – धनादेश न वटलेच्या खटल्यामध्ये आरोपीला एक महिना तुरुंगवास, 1 हजार रुपये दंड व रुपये 75 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुजारी यांनी गुरुवारी (दि. 5) आरोपी नतीन महादेव कुर्ले (रा. बारामती) याला दिले आहेत.
फिर्यादी सुनील टकले हे बारामती येथील प्रसिद्ध टेलर आहेत. आरोपी व फिर्यादी हे जुने मित्र होते. आरोपीने कोरोना काळात घरगुती आर्थिक अडचणी मुळे फिर्यादी कडून रुपये 75 हजार हात उसने बिनव्याजी पैसे घेतले होते व त्याचा नोटरी करारनामा लिहून दिला होता.
परंतु वेळेत पैशाची परतफेड आरोपी ने केली नाही. म्हणून फिर्यादीने तो चेक स्वतः च्या बँक खात्यावर भरला असता तो न वटता परत आला.
त्यामुळे फिर्यादी यांनी अॅड. विशाल विजयकुमार बर्गे यांच्या मार्फत नोटीस पाठवून पुढे फौजदारी खटला बारामती कोर्टात दाखल केला होता.
आरोपीने असा बचाव घेतला होता की, फिर्यादी याला आरोपीने वेळोवेळी ही रक्कम दिली होती; परंतु उभयतां मधील जुन्या एका आर्थिक व्यवहारातील एक धनादेश फिर्यादीने वापरुन मुद्दाम पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा खोटा खटला दाखल केला आहे.
फिर्यादी तर्फे अॅड विशाल बर्गे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, नोटरी बाबत तसेच धनादेशाबाबत फिर्यादीने गैरवापर करू नये म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही अथवा त्याच्या बँकेत जाऊन धनादेशाबाबत स्टॉप पेमेंट केले नाही. वकिलांच्या नोटिशीला तत्काळ उत्तर देऊन स्वत:ची बाजू मांडली नाही.
तसेच वकीलपत्र, नोटरी आणि धनादेशावरील आरोपीची सही सारखीच आहे. आरोपीने धनादेशावरील सही नाकारली नाही.
या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निकाल फिर्यादीचे वकील अॅड. विशाल बर्गे यांनी न्यायालयात सादर केले. अॅड. बर्गे यांचा युक्तिवाद मान्य करून मे कोर्टाने आरोपीस तुरुंगवास, दंड तसेच फिर्यादी याला आरोपीने नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.





