Pimpri : समस्यांकडे लक्ष द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू!

हिंजवडी : ” राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी हात जोडून विनंती करते की, हिंजवडीच्या समस्यांकडे प्राधान्याने ( हाय प्रायोरिटीने) लक्ष घाला, अन्यथा गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू ” असा इशारा बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिला.
१२ ऑगस्टला अवजड वाहनाने चिरडल्याने माण मध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्युषा संतोष बोराटे या अकरा वर्षाच्या चिमुकलीचा सिमेंट कॉक्रीटच्या मिक्सरखाली चिरडून दुर्देवी मृत्यू झाला होता.
या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. २५) माण ठाकरवस्ती रस्त्यावरील जॉयविले सोसायटीमध्ये जाऊन बोराटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मृत प्रत्युष्याला न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी बोराटे परिवाराला दिले. या भेटीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीच्या रस्त्याची दुरावस्था व मूलभूत प्रश्नावरून राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सडकून टीका केली.
त्या म्हणाल्या, “शहरात नियम आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. पीक हवरला आवजड वाहनांवरील बंदीचा कोणताही परिणाम दिसत नाही. निष्काळजीपणामुळे निरपराधांचे जीव जात आहेत. हिंजवडीतील समस्यांकडे सरकारचे लक्ष नाही. जर मुख्यमंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर गणेशोत्सवानंतर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. असा इशारा ही दिला.
अपघातानंतर प्रत्युषाच्या कुटुंबीयांसह परिसरातील विविध सोसायटीतील रहिवाशांनी प्रशासनाच्या निष्काळजी विरोधात टॉर्च आणि कॅण्डल मार्च काढत निषेध नोंदविला होता. या प्रकरणाशी संबंधित बिल्डराविरोधात देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी बोराटे कुटुंबीय व त्यांच्या नातलगांनी केली आहे.मुळशीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी घोटावडे, भुगाव, पिरंगुट येथे सांत्वनपर भेटी दिल्या.
” हिंजवडीत अवजड वाहने नियमबाह्यपणे रस्त्यावर धावतात, निवासी भागात देखील आरएमसी प्लांट आहेत, पीएमआरडीएने मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर अजूनही राडारोडा तसाच पडून आहे. सगळ्या रस्त्यावरील खड्डे अजूनही बुजवण्यात आले नाही. हिंजवडीमध्ये कोट्यावधी रुपयांचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो. सुविधाआभावी इथून कंपन्या परराज्यात जात आहेत. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की, हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा गणपतीनंतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.”
सुप्रिया सुळे ( खासदार बारामती लोकसभा )





