Pune District : पवारांचा संदेश भुजबळांनी गुपचूप वाचला

शेलपिंपळगाव : शरद पवार यांनी छगन भुजबळांना पत्रिकेवर एक लिखित संदेश दिला, त्यानंतर दोघांमध्ये काही सेकंदाचा संवाद ही झाला अन् दोघे एकमेकांकडे बघून हसू ही लागले. हे सगळे घडले चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यात.
चाकण बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर हे पुतळे उभारण्यात आलेत. याच मंचावर हे दोघे 5 वाजून 45 मिनिटांनी पोहचले. पुतळ्यावे अनावरण पवारांच्या हस्ते होते अन् अध्यक्षस्थानी भुजबळ होते, त्यामुळे मंचावर दोघे एकमेकांच्या बाजूला बसले होते. मात्र मंचावर आल्यापासून दोघांनी एकमेकांकडे पाहणे ही टाळले होते.
मुळातच पवार हे चार वाजताच पोहचले होते अन् भुजबळ तब्बल दीड तास उशिरा आल्याने पवारांना दीड तास ताटकळत बसावे लागले त्यामुळे वेळेला महत्व देणार्या पवारांना साहजिकच थोडा का होईना राग आला असेल याची कल्पना भुजबळांना होतीच. त्यामुळे मंचावर आल्यापासून भुजबळांनी ही बोलणे टाळले. मात्र त्याचवेळी पवारांनी पत्रिकेवर दोन ओळी मजकूर लिहिला. मग भुजबळांच्या हातातील पत्रिका काढून घेतली अन स्वतःच्या हातातील पत्रिका त्यांच्या हातात सोपवली.
मग पवारांनी भुजबळांना खुणावले अन् वीस मिनिटांनी दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाला. त्यानंतर दोघे एकमेकांकडे पाहून हसले ही. मंचावरील या घडामोडींमुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या आहेत.





