Lok Sabha Election 2024 : ‘दिंडोरी पवार गटाकडे तर, नाशिक ठाकरे गटाकडे’; शरद पवारांची मोठी घोषणा

Lok Sabha Election 2024 – प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीला वेळ कमी असल्यामुळे आम्ही सर्व तयारीला लागलो आहोत.
त्यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. इतकेच नाही तर दिंडोरी लोकसभा मतदार संघ हा पवार गट तर नाशिक लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचा उमेदवार असेल अशी घोषणा देखील शरद पवार यांनी केली.
यासह जागावाटपचे काम जवळजवळ संपले असून लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती देखील त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांना दिली. राज्यात विशेषतः शेतकरी वर्ग हा सत्ताधारी पक्षावर नाराज असून राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे.
नाशिक, धुळे, सातारा, पुणे आदी कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. ऊस हे महाराष्ट्राचे प्रमुख पीक आहे. ऊस आणि इथेनॉल निर्मिती याबाबत केंद्र सरकारचे धोरण योग्य नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी देखील सरकारवर नाराज असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
ईडीच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईचा अभ्यास केला तर 2005 ते 2023 या 17 वर्षांच्या कालावधीमध्ये ईडीच्या कारवाईनंतर न्यायालयात ते प्रकरण टिकले नसल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे. याचा अर्थ असा होतो की, केसेस करायच्या, अटक करायची, तुरुंगात टाकायचे आणि त्यात महिने घालवायचे, असे दिसत असल्याचे शरद पवार म्हणाले.
2014 ला मोदी सत्तेवर आल्यानंतर 121 लोकांची ईडीच्या मार्फत चौकशी सरकारने केली. मात्र यातील 115 नेते हे विरोधी पक्षाचे होते. याचा अर्थ फक्त विरोधी पक्षासाठी तपास संस्था वापरल्या जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. यामध्ये काँग्रेस 26 एनसीपी 11 अशी यादीच शरद पवार यांनी वाचून दाखवली.





