पुणे जिल्हा | पवार मंडळी जेवणं घालू लागली- अजित पवार

बारामती, (प्रतिनिधी)- लोकसभा-विधानसभा निवडणुकीत बारामतीत आत्तापर्यंत कधी झाले नाही ते घडू लागले. पवार मंडळी जेवणं घालू लागली आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने घरी बोलावू लागली आहेत.
गणपती, ईद, नवरात्रीला मंडळांना भरभरून वर्गणी देवू लागली आहेत. बारामतीकरांसाठी हे काही तरी वेगळं घडत आहे. तालुक्यात अशी प्रथा याअगोदर नव्हती.
मात्र निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी असे प्रकार सुरु आहेत, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबातील आपल्या विरोधातील अन्य सदस्यांवर सडकून टीका केली.
बारामतीत बुथ कमिटीच्या मेळाव्यात त्यांनी पवार परिवारातीलच विरोधी सदस्यांवर जोरदार निशाणा साधत फटकेबाजी केली. पवार म्हणाले की, कारखाने, नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत घडत असलेले प्रकार आपण यापूर्वी लोकसभेला पाहिला.
नगरपरिषद निवडणूक असली की काही लोक दरवाजा उघडा ठेवूनच बसतात. आमची एवढी मते आहेत, असे सांगतात. आता हे लोण पार विधानसभा निवडणूकीपर्यंत येवून पोहोचले आहे. बारामतीत अशी कधी प्रथा नव्हती. बारामतीकरांसाठी हे सगळे नवखे आहे.
पवार म्हणाले, कुटुंबात भांड्याला भांडं लागतं..!, जावा- जावांच्यात किती पटतं. मला माहिती आहे. भावा- भावांच्यात ही किती पटतं तेही मला माहिती आहे.
अलीकडे चुलत्या- पुतण्यातही ही किती पटतं हे मला माहिती आहे. बहिण भावाचंही माहित आहे.! त्याच्यामुळेच मी लाडकी बहीण योजना काढली. सगळ्याच बहिणींना खुश केले.
पवार म्हणाले, तुम्ही तुमचा ‘इगो’ लांब ठेवा. मला ही खूप ‘इगो’ आहे. राष्ट्रवादीची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यापासून अजित पवार बऱ्याचदा हसताना दिसतो आहे. जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून विरोधकांवर मी एकदाही टीका केली नाही.
आपले नाणे खणखणीत, वाजवून दाखवा
विरोधक काहीही बोलतील, त्यांना आता विकासकामांबद्दलही शंका यायला लागली आहे. फक्त इमारती उभ्या करणे, रस्ते तयार करणे, पूल बांधणे हा विकास आहे का? असे ते म्हणत आहेत.
त्यांच्या विकासाची व्याख्या वेगळी असावी, असे म्हणत त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टोला लगावला. निवडणूकीत मतभेद निर्माण करण्याचे, खच्चीकरण करण्याचे प्रयत्न होतील पण त्याकडे लक्ष देवू नका, असेही ते म्हणाले. आपले नाणे खणखणीत आहे, ते वाजवून दाखवा असे आवाहन त्यांनी केले.
तोलून मापून बोला
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे कान टोचताना पवार म्हणाले, आपल्यातील जे मतभेद, गटतट आहेत ते विधानसभेपर्यंत विसरा. ही निवडणूक आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे.
या गोष्टीचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व शहरातील सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मतभेदाबाबत बोलायचे नाही.
एक जीवाने विधानसभेच्या कामाला लागा मतदारांपर्यंत संपर्क ठेवा, मतदान होईपर्यंत कोणीही कुठलेही दौरे करू नका, तोलून मापून बोला, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.





